यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा पडल्याचे उद्गार निघत असले, तरी प्रत्यक्षात मात्र रेल्वे मंत्रालयाने ‘एमयुटीपी-३’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिल्याने ११ हजार कोटी रुपयांचा भरघोस प्रकल्प मुंबईकरांच्या पदरात पडला आहे. या प्रकल्पांतर्गत कळवा-ऐरोली नवीन मार्गिका, कर्जत-पनवेल दुहेरीकरण, विरार-डहाणू चौपदरीकरण आदी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प २०२१पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाशिवायही यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाद्वारे मुंबईकरांसाठी २६ सरकते जिने, एमयुटीपी-२मधील खोळंबलेल्या प्रकल्पांसाठी १०२२ कोटी रुपये आदी गोष्टी मिळालेल्या आहेत.
‘प्रभु’ अजि गमला..
मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाद्वारे (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी) प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील काही प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहेत. यात सीएसटी-कल्याण यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका, मध्य रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तन, पश्चिम रेल्वेवर सहावी मार्गिका, हार्बर मार्गाचे विस्तारीकरण आदी गोष्टींचा समावेश आहे. मात्र या प्रलंबित प्रकल्पांना धुगधुगी देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने फक्त १०२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी ५११ कोटी रुपये केंद्र सरकार देणार असून उर्वरित ५११ कोटींची रक्कम राज्य सरकारकडून येणार आहे.
हे प्रकल्प पूर्ण होण्याआधीच रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी अशा एमयुटीपी-३ या टप्प्याला मंजुरी देत त्यासाठी ११,४४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात कर्जत-पनवेल दुहेरीकरण, विरार-डहाणू चौपदरीकरण, कळवा-ऐरोली नवीन मार्गिका आदींसह सहा मोठय़ा प्रकल्पांचा समावेश आहे. याच प्रकल्पांतर्गत नव्या गाडय़ांसाठी २८९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार ५६५ नवे डबे मुंबईकरांसाठी येणार आहेत. यातील गमतीचा भाग म्हणजे एमयुटीपी-२ अंतर्गत मुंबईत येऊ घातलेल्या बंबार्डिअर कंपनीच्या नव्या गाडय़ांचा मार्ग अद्यापही मोकळा झालेला नाही.
तसेच या प्रकल्पांतर्गत मुंबईतील एकूण २० स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील १०, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील आठ आणि हार्बर मार्गावरील दोन स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. तर रेल्वेरूळ ओलांडण्यास प्रतिबंध या कार्यक्रमांतर्गत मुंबईतील विविध स्थानकांदरम्यान पादचारी पूल वगैरे बांधण्यासाठी या प्रकल्पात ५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त मुंबईकरांसाठी या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन २६ सरकते जिनेही येण्याची शक्यता आहे. तसेच प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यांच्यातील जीवघेणी पोकळी कमी करण्यासाठी म्हणजेच प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेला १५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीमधून पश्चिम रेल्वेवरील बहुतांश स्थानकांमधील प्लॅटफॉर्मची उंची वाढणार आहे.

कोणत्या स्थानकांचा पुनर्विकास
ल्ल मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर (पश्चिम), वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, मीरारोड, भाईंदर, विरार, दादर (मध्य), कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहाड, वडाळा, चेंबूर.

रेल्वेरूळ ओलांडण्यास प्रतिबंध कुठे?
ल्ल ठाणे-कळवा (विटावा पुल), वांद्रे-खार, माहीम-माटुंगा, पार्ले-अंधेरी, जोगेश्वरी-गोरेगाव, घाटकोपर-विक्रोळी, नाहूर-मुलुंड, मुलुंड-ठाणे, दिवा-कोपर, वडाळा-जीटीबी, गोवंडी-मानखुर्द, वाशी-सानपाडा.