नऊ दिवसांनी कळवा स्थानकावर पोलिसाने हेरले
दहा दिवसांपूर्वी घरातून मॉलमध्ये जाण्यासाठी निघालेला ११ वर्षांचा गणेश कंदाली अखेर मंगळवारी रात्री कळवा रेल्वे स्थानकावर सापडला. मात्र गणेशच्या गायब होण्यामागचे गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत गणेश विरोधाभास असलेली उत्तरे देत असून त्यामुळे नऊ दिवस गणेश नेमका कुठे होता, त्याने अन्नपाण्याची व्यवस्था कशी केली, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गणेशला शोधण्याच्या प्रयत्नात नेहरूनगर पोलिसांनी हैद्राबादपर्यंत धाव घेतली होती, मात्र त्या वेळी एका वेगळ्याच खंडणीखोरीला सामोरे जावे लागले.
मूळ कर्नाटकचा असलेला पण कुल्र्यातील कामगारनगर येथे मावशीजवळ राहात असलेला गणेश कंदाली सोमवार, २ मे रोजी घरातून जवळच राहात असलेल्या आजीकडे जाण्यास निघाला. परंतु तो आजीकडे पोहोचलाच नाही. संध्याकाळ झाली तरीही गणेशचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाची निर्मिती करून गणेशचा शोध सुरू झाला.
गणेशच्या घराजवळचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळविण्यात आले. त्यात जवळच्या एका मॉलमध्ये जाऊन त्याने लस्सी घेतल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे काहीच कळू शकले नाही. गणेशचा शोध घेण्यासाठी आम्ही मुंबईसह परिसरातील आणि रेल्वेच्या पोलीस ठाण्यांना कळविले, परंतु कुठूनही काहीच माहिती मिळत नव्हती. पाच दिवस उलटल्यानंतरही गणेशचा काहीच पत्ता लागत नसल्याने कुटुंबीयही चिंतित झाले होते.
हैद्राबादी चकवा
चार दिवसांपूर्वी कंदाली परिवाराला एक फोन आला. आपका बेटा हैद्राबाद में चार गुनहगार लोगों के साथ है, आप उसको लेके जाओ, असे पलीकडून एक माणूस सांगत होता. कुटुंबीयांनी ही गोष्ट नेहरूनगर पोलिसांना कळविली तशी, पोलिसांचे पथक आणि कुटुंबीय हैद्राबादला रवाना झाले. हैद्राबादला पोहोचल्यानंतर या पथकाने या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधला, तेव्हा १० हजार रुपये मी सांगतो त्या बँक खात्यामध्ये टाकले तरच माहिती देईन, असे समोरची व्यक्ती सांगू लागला. तेव्हा पोलिसांना शंका आली. त्यांनी वारंगल पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा वारंगल पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून पैसे उकळणारा एक भामटा असून त्याने अशा प्रकारे अनेकांना फसविल्याचे सांगितले. हैद्राबादहून पोलिसांचे पथक आणि गणेशचे कुटुंबीय निराश होऊन परत आले.
मंगळवारी रात्री ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार खरात यांनी कळवा रेल्वे स्थानकाला प्रवासी पुलाच्या खाली एक लहानगा मुलगा दिसला. खरात त्याची विचारपूस करण्यासाठी सरसावले असता, तो मुलगा दूर जाऊ लागला. खरात यांचा संशय बळावला. त्यांनी मुलाला विश्वासात घेतले, त्याची विचारपूस केली तेव्हा हा मुलगा ११ वर्षांचा गणेश कंदाली असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने याची माहिती नेहरूनगर पोलीसात दिली. पोलिसांनी कुटुंबीयांना कळवले. त्यानंतर गणेशला ताब्यात घेतले.

गूढ मात्र कायमच!
गणेशची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने अनेक विरोधाभास असलेली उत्तरे दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांनी सांगितले. मी पुण्याहून येताना कळवा स्थानकावर उतरलो, गेले चार दिवस त्याच स्थानकावर राहतोय, अशी उत्तरे त्याने पोलिसांना दिली. नऊ दिवस खाण्यापिण्याचे काय केले, हे विचारल्यावर मात्र त्याला काहीच उत्तर देता आले नाही. गणेशला काही काळ त्याच्या कुटुंबीयांसोबत राहू देत असून त्यानंतर त्याची चौकशी करून नऊ दिवसांत त्याने काय केले, त्याला कोणी पळवून नेले की तो स्वत:हून घर सोडून गेला, याची उत्तरे आपल्याला मिळू शकतील, असेही कोपर्डे यांनी स्पष्ट केले.