मुंबईतील अकारावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आज (मंगळवार) ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपणार होती. परंतु, सर्व्हर स्लो झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना अडचण आली होती. त्यामुळे ही मुदत २९ जूनपर्यंत सांयकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, गत आठवड्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु, तांत्रिक कारणामुळे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. सर्व्हर स्लो झाल्याच्या तक्रारीनंतर तीन सर्व्हर वाढवण्यात आले आहेत आणि बँडविड्थ वाढवण्याच्या सूचना दिल्याचे तावडे यांनी सांगितले होते.

http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाइटवर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन टप्प्यात ही अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे. गुणवत्ता यादीसाठी भाग एक आणि भाग दोन मंजुरीसह पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही.

प्रवेशाचे वेळापत्रक
’ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे : १६ ते २७ जून (२९ जून)
’सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : ३० जून सायंकाळी ५ वा.
’ऑनलाइन अर्ज तपासून त्रुटी दुरुस्त करणे : १ व ३ जुलै सायंकाळी ५ वा.
’प्रथम गुणवत्ता यादी जाहीर : ७ जुलै सायं. ५ वा.
’प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया : ८, १० व ११ जुलै रोजी स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत.
’दुसरी गुणवत्ता यादीसाठी आवश्यकता असल्यास पसंतीक्रम बदलणे : १२ व १३ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंत.
’दुसरी गुणवत्ता यादी जाहीर : १७ जुलै सायं. ५ वा.
’दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया : १८ व १९ जुलै रोजी स. १० ते सायं. ५
’तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी आवश्यकता असल्यास पसंतीक्रम बदलणे : २० व २१ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंत.
’तिसरी गुणवत्ता यादी जाहीर : २५ जुलै सायं. ५ वा.
’तिसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया : २६ व २७ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंत.
’चौथ्या गुणवत्ता यादीसाठी आवश्यकता असल्यास पसंतीक्रम बदलणे : २८ व २९ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंत.
’चौथी गुणवत्ता यादी जाहीर : १ ऑगस्ट सायं. ५ वा.
’चौथ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया : २ व ३ ऑगस्ट रोजी स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत.