ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना सचैल स्वेदस्नानाचा अनुभव देणाऱ्या उपनगरीय रेल्वेचा प्रवास काहीसा सुखकारक करण्यासाठी रेल्वे बोर्डाने कंबर कसली असून, मुंबईत येत्या चार महिन्यांत वातानुकुलित गाडी सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने खास मुंबईसाठी १२ गाडय़ा तयार करण्याचे काम चेन्नई येथील इंटिग्रल कोचिंग फॅक्टरीला दिले आहे. त्यापैकी एक गाडी लवकरच मुंबईत धावेल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे संचालक प्रभात सहाय यांनी सोमवारी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी घोषणा झालेल्या वातानुकुलित लोकलचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. स्वयंचलित दरवाजे असलेल्या १२ गाडय़ा तयार करण्याचे काम चेन्नईच्या कारखान्यात सुरू असून, त्यातील एक गाडी तयार आहे. ती चाचण्यांसाठी येत्या तीन महिन्यांत मुंबईत येण्याची शक्यता पश्चिम रेल्वेने वर्तवली होती. त्याला आता सहाय यांनीही दुजोरा दिला आहे.
त्याचबरोबर मुंबईसाठीचे ११ हजार कोटींचे प्रकल्प मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचेही सहाय यांनी सांगितले. जागतिक बँक आणि सरकार यांच्या ५०-५० टक्के खर्चातून ही कामे करण्यात येणार आहेत.
* बंबार्डिअर २६ जानेवारीला
तब्बल ३० वर्षांपेक्षा जुन्या कोंदट लोकल गाडय़ांतून मुंबईकरांना २६ जानेवारीपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. अधिक आरामदायक आणि हवेशीर व एसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या दोन नव्या बंबार्डिअर गाडय़ा पश्चिम रेल्वेमार्गावर धावणार आहेत.
* ऐरोली-कळवा जोडमार्ग
कळवा स्थानकाजवळून ट्रान्स हार्बर मार्गाला जोडणारी एक उन्नत मार्गिका बांधून ट्रान्स हार्बर मार्ग कल्याण आणि डोंबिवलीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याणहून वाशी आणि पनवेलकडे थेट लोकल सोडणे शक्य होईल.
* कर्जत-पनवेल उपनगरी मार्गिका
कर्जत आणि पनवेल या स्थानकांदरम्यान सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी मार्गिका आहे. तेथे उपनगरीय सेवा धावू शकेल, अशी मार्गिका टाकण्यात येणार आहे. त्यासाठी १५६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
* विरार-डहाणू तिसरी व चौथी मार्गिका
सध्या विरार आणि डहाणू यांदरम्यान दोन मार्गिका आहेत. या मार्गावर आणखी दोन मार्गिका टाकण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी तिसरी मार्गिका उपनगरी गाडय़ांसाठी आणि चौथी मार्गिका लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी वापरली जाईल.
* या स्थानकांचा कायापालट : मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, विरार, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण व शहाड, चेंबूर आणि वडाळा रोड.