देवनार कचराभूमीवर लागलेली आग विझली असली तरी तिच्या झळा मात्र आजही आजुबाजूच्या रहिवाशांना जाणवत आहेत. यामुळे कचराभूमीवर सोमवारी तातडीने १२ सीसीटिव्ही बसविण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत फडणवीस यांनी ट्विट केले. रहिवाशांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच व्यथा मांडली.
रहिवाशांचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये कचराभूमीबाबत सुचविलेल्या उपाययोजना आणि कृती आराखडय़ाची माहितीही दिली. यामध्ये कचराभूमीवर बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याचबरोबर दोन अग्निशमन दलाच्या गाडय़ा तेथे कायमस्वरुपी उभ्या केल्या जाणार आहेत. एका महिन्यात कचराभूमीच्या तुटलेल्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केले जाणार आहे. कचराभूमीत तयार होणाऱ्या मिथेन वायूच्या प्रश्नावर निरीचे संचालक रमेश कुमार आणि आयआयटीच्या तज्ज्ञांना अभ्यास करुन सूचना करण्यास सांगितले आहे. याशिवाय कचऱ्यातून वीज निर्मिती करणे हा पर्याय खुला असून त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे.
या सर्व कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक संयुक्त समिती नेमण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.