पुढील महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, या विस्तारात आणखी १२ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी वृत्तवाहिन्यांना दिली. या विस्तारामध्ये घटक पक्षांच्या सदस्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा या विस्तारामध्ये मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद स्वीकारावे, अशी भाजपची इच्छा आहे. पण स्वतः आठवले यासाठी तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून शिफारस केलेल्या पक्षाच्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे दिसते. भाजपमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंत्रिपद मिळण्यासाठी भाजपच्या वेगवेगळ्या भागातील आमदारांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.