‘सत्तेवर येताच राज्य टोलमुक्त करू’, असे आश्वासन देत सत्तारोहण करणाऱ्या युती सरकारने १२ मार्गावरील टोलनाके कायमचे बंद करण्याचा तसेच कार, एसटी व शाळांच्या बस यांना ५३ टोलनाक्यांवरील टोलवसुलीतून मुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली. ३१ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्तीची सवलत सुरू होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने संपूर्ण टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. तत्कालीन आघाडी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ४२ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सत्तांतरानंतर टोलमुक्तीसाठी सरकारवर दबाव येत होता. त्यातच शीव-पनवेल मार्गावरील खारघर टोलनाक्यावर वसुली सुरू झाल्यामुळे सरकारविरोधात टीकेचे सूर उमटू लागले होते. या पाश्र्वभूमीवर टोल रद्द करण्याबाबत उपाय सुचविण्यासाठी मुंबई विभागाचे मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारने आणखी १२ टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ११, तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका टोलनाक्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २७, तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या २६ टोलनाक्यांवरून कार, एसटी, स्थानिक परिवहन सेवांच्या बसगाडय़ा, शाळा बस यांना टोलमधून वगळण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. ही वाहने टोलमधून वगळण्यापोटी सरकारला टोल कंपन्यांना वार्षिक ४०३.९३ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
बंद होणारे टोलनाके
*वडवळ (अलिबाग- पेण- खोपोली)
*शिक्रापूर (वडगाव- चाकण- शिक्रापूर)
*मोहोळ  (मोहोळ- कुरुल- कामती)
*भंडारा डोंगर (वडगाव- चाकण- शिक्रापूर)
*कुसबस (टेंभुर्णी- कुर्डुवाडी- बार्शी)
*अकोले (अहमदनगर- करमाळा- टेंभुर्णी)
*ढकांबे, नांदुरी, सप्तशृंगी गड (नाशिक- वणी)
*तापी पुलाजवळ (भुसावळ- यावल- फैजपूर)
*रावणटेकडी (खामगांव वळण मार्ग)
*तडाली (तडाली रेल्वे उड्डाणपूल चंद्रपूर)
कोल्हापूरबाबत
निर्णय लवकरच
कोल्हापूर टोलला होणारा विरोध लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल आल्यानंतर ३१मे पूर्वी कोल्हापूरच्या टोलबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
ही केवळ एक झलक असून येत्या काही दिवसांत मुंबईच्या प्रवेशद्वारावरील आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलबाबतही सकारात्मक निर्णय होईल.
    – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री