आहार आणि आरोग्य यांचा समतोल साधत रूचीपालट आणि रूचीवैविध्याला चालना देतानाच आरोग्याचे तंत्र सांभाळणाऱ्या तब्बल १२० पाककृतींची माहिती देणारे ‘पूर्णब्रह्म’ हे पुस्तक ‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे या सर्व पाककृती वैद्य खडीवाले यांनी सिद्ध केल्या आहेत. या पुस्तकाइतकाच त्याचा प्रकाशनसोहळादेखील वाचकांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यात वाचकांच्या आहारविषयक शंकांचे निरसन थेट वैद्य खडीवाले हेच करणार आहेत.
बुधवार २३ एप्रिल रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात दुपारी चार वाजता प्रकाशन समारंभ होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश, या नियमानुसार या कार्यक्रमात वाचकांना सहभागी होता येणार आहे.
गोल्ड विनर प्रस्तुत, ‘पितांबरी’द्वारा सहप्रायोजित आणि ड्रिम व्हेकेशन्सने पुरस्कृत केलेले ‘पूर्णब्रह्म’ हे मासिकाच्या आकारातील ‘लोकसत्ता’चे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीच्या पंगतीला पूर्णत्व देणारे मानाचे पान ठरणार आहे!