भविष्यात कोणत्याही शहरात ‘२६/११’ची पुनरावृत्ती घडू नये यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची महत्त्वाकांक्षी योजना गृह विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार आर्थिक राजधानी मुंबईतही पहिल्या टप्प्यात १२०० कॅमेरे बसविण्याचे काम नोव्हेंबपर्यंत पूर्ण होईल. तर संपूर्ण शहर सप्टेंबर २०१६ पर्यंत सीसीटीव्हीच्या नजरेत येणार असल्याची माहिती गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली. 

मुंबईत सुमारे सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपनीला ठेका देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत १२०० कॅमेरे नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यासाठी ३६७ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून हे काम सुरू झाले आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील सीसीटीव्ही बसविण्याची योजना आता अंतिम टप्प्यात आहे. शहरातील ९० टक्के काम पूर्ण झाले असून दोन झोनमधील सीसीटीव्ही कॅमेरे प्रायोगित तत्त्वावर सुरूही झाले आहेत. उर्वरित काम येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण होणार असून याच महिन्यात या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येणारे पुणे हे पहिलेच शहर ठरणार आहे. पुण्याप्रमाणे नाशिक शहरातही कुंभमेळ्यासाठी ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून ते कामही लवकरच पूर्ण होईल.