संसार अर्धवट सोडून गेलेल्या पतीच्या मागे दोन मुली आणि एका मुलाचा सांभाळ करणाऱ्या महिलेवर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वीज कोसळली. दिवसभर मुलांसाठी घरकाम करणाऱ्या या महिलेच्या तेरा वर्षीय मुलीच्या पोटात १८ आठवडे ७ दिवसांचा (पावणेपाच महिन्यांचा) गर्भ राहिल्याने या आईवर आभाळ कोसळले आहे. मी कोणाचे काय बिघडवले होते, नियतीने असा खेळ का खेळावा, असा सवाल या आईपुढे पडला आहे. खांदेश्वर गावालगतच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका आईची ही हृदय हेलावणारी करुण कहाणी. खांदेश्वरजवळील बडय़ा रुग्णालयात या पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेतील पीडित मुलीने पोलिसांना संबंधित व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आई व भाऊ कामावर गेल्यानंतर पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत झोपडीत असायची. पोलिसांनी पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगावा यासाठी समुपदेशकाचे साहाय्य घेतले आहे. पोलिसांचा संशय परिसरातील एका व्यावसायिकावर असल्याचे कळते. या मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तेरा वर्षीय मुलगी आणि पावणेपाच महिन्यांचा गर्भ यामध्ये मुलीचे प्राण वाचविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला मुलीच्या आईला आणि पोलिसांना दिला आहे.
अनेक महिला संघटनांनी या घटनेबाबत संतापजनक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. पीडित मुलगीच काही सांगत नसल्याने या प्रकरणी बलात्काऱ्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे करीत आहेत.