चंदिगडमधील ३२ आठवडय़ांच्या १० वर्षांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी नाकारण्यात आली होती. गुरुवारी त्या मुलीची सिझेरियन शस्त्रक्रियेतून प्रसूती झाली. सुमारे आठ दिवसांपासून गर्भपाताच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईतील १३ वर्षांच्या मुलीबाबत काय निर्णय घेतला जाईल याबाबत कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

गेल्या आठवडय़ात १३ वर्षांच्या मुलीच्या पालकांनी तिच्यावर बलात्कार करणाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याने बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत चौकशीसाठी पाच दिवस तिला बालगृहात ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या पूर्वतयारीमध्ये बराच वेळ वाया जात असून त्या मुलीला २८ वा आठवडा सुरू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असून येत्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे शक्य होईल, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी त्या मुलीचे २७ आठवडे पूर्ण झाले असून तिच्या आरोग्याचा विचार करता लवकरात लवकर गर्भपात करणे आवश्यक आहे, असेही डॉ. दातार यांनी सांगितले.

भारतात २० आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने मुंबईतील ९ गर्भवतींनी गर्भपाताच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापैकी सात महिलांनाच गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर दोन प्रकरणांत न्यायालयाने गर्भपातास नकार दिला होता. अनेकदा गर्भातील व्यंग २० आठवडे उलटून गेल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे २० आठवडय़ांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. दातार यांनी सांगितले.

सहा महिला गर्भपाताच्या प्रतीक्षेत

कांदिवलीत राहणाऱ्या या १३ वर्षांच्या मुलीनंतर मुंबईतील आणखी सहा महिला गर्भपाताच्या प्रतीक्षेत आहे. या महिलांचे २० आठवडे उलटून गेले असून गर्भात व्यंग असल्याने या महिलाही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.