विरार-डहाणू रोड यांदरम्यान ‘मेमू’ऐवजी उपनगरीय सेवा ; चर्चगेट आणि दादर येथूनही डहाणूसाठी एक सेवेची भर 

चर्चगेटपासून विरार आणि डहाणू रोडपर्यंत ३५ ते ४० लाख प्रवाशांसाठी दर दिवशी १,३०५ सेवा चालवणाऱ्या पश्चिम रेल्वेने १ सप्टेंबरपासून सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने विरार-डहाणू यादरम्यान चालणारी ‘मेमू’ सेवा बंद केली आहे. आता या ‘मेमू’च्या जागी उपनगरीय गाडय़ा धावणार आहेत. त्याशिवाय दादर आणि चर्चगेट या स्थानकांवरूनही डहाणू रोडसाठी एक-एक जादा सेवेची भर पडणार आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या गर्दीच्या वेळी दर तीन मिनिटांनी एक उपनगरीय सेवा चालवली जाते. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर अधिक सेवांचा समावेश करण्यात तांत्रिक अडचणी होत्या. त्यातच मुंबई सेंट्रल ते बोरिवली यांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे कामही खोळंबल्याने अधिक सेवा वाढवणे शक्य नव्हते. तरी पश्चिम रेल्वेने कसरत करत १४ नव्या सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. या १४ पैकी दहा सेवा विरार-डहाणू या मार्गावर असून चार सेवा दादर किंवा चर्चगेटपर्यंत येतील. त्याशिवाय सकाळी ५.१२ वाजता चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी गाडी आता ५.२६ला महालक्ष्मी स्थानकातून रवाना होणार आहे.
mv01