राज्यातील धरणांमध्ये पाण्याचा १२ टक्के साठा शिल्लक असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सध्या शहरातील २० टक्के पाणीकपात पाहता हा साठा जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. याखेरीज पाण्याचा राखीव साठाही असून त्यामधून आणखी महिनाभर शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सहा धरणांमध्ये सुमारे साडेचौदा लाख दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर धरणांमध्ये एकूण ११ लाख ३९ हजार दशलक्ष लिटर पाणी जमा होते. म्हणजेच एकूण क्षमतेच्या ८६ टक्के पाणी जमा झाले होते. त्यानंतर पालिकेने तातडीने सुरू केलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे २५ मे रोजी सर्व धरणातील एकूण जलसाठा २ लाख ६ हजार दशलक्ष लिटर राहिला आहे, अशी माहिती पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्यांनी दिली. हा साठा एकूण क्षमतेच्या १४ टक्के आहे. सध्याच्या पाणीकपातीत वाढ केली जाणार नसून हा साठा ३० जूनपर्यंत वापरता येईल. धरणांमधील राखीव जलसाठा वापरल्यास आणखी महिनाभर मुंबईला पाणीपुरवठा होऊ शकेल. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर पावसाला सुरुवात होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज पाहता मुंबईकरांना पुरेसा साठा धरणांमध्ये आहे.