विधासभेच्या सर्व सदस्यांना पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे मार्चअखेपर्यंत प्रत्येकी ५० लाख रुपये या प्रमाणे स्थानिक विकास निधी म्हणून १४३ कोटी रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी निधी वितरणाचा आदेश काढण्यात आला आहे.
मागील २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात आमदारांना स्थानिक विकास निधी म्हणून प्रत्येकी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर नवीन विधानसभा अस्तित्वात आली. आता नव्याने निवडून आलेल्या आमदारांना खास बाब म्हणून पुढील तीन महिन्यांसाठी ५० लाख रुपये निधी द्यावेत, अशी आमदारांची मागणी होती. त्याला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातच मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार विधानसभेच्या २८६ आमदारांना ( दोन जागा रिक्त आहेत) प्रत्येकी ५० लाख या प्रमाणे अतिरिक्त १४३ कोटींचा निधी वितरीत करण्यात आदेश काढण्यात आला. पूर्वीचे आमदार नव्याने निवडून आले, त्यांनाही या निधीचा लाभ मिळणार आहे.