एकीकडे एमएमआरडीने मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील डेपो बांधण्यासाठी आरे कॉलनी येथील ३२९२ झाडे तोडण्याची परवानगी मागितली असतानाच, तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भांडूप परिसरातील तब्बल १५६६ झाडांना उखडण्यास वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. या झाडांमध्ये पिंपळ, आंबा, साग, करंज, कदंब, सातवीण, सुबाभूळ अशा झाडांची संख्या अधिक आहे. ही झाडे पुनरेपित करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी एवढय़ा मोठय़ा संख्येने झाडे नेमकी कुठे आणि कशी पुनरेपित करणार याबाबत पालिकेकडे कोणताही आराखडा नाही. मात्र विरोधी पक्षांच्या मागणीनंतर आयुक्तांनी यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची मागणी मान्य केली.
नागरी हिताचे काम असल्याने या प्रस्तावाला कोणत्याही सदस्याने विरोध केला नाही. ही झाडे पुनरेपित करण्यास सांगण्यात आले असले तरी आंबा, पिंपळ अशी आकारमानाने विस्तारलेली झाडे पुनरेपित करण्याचा अनुभव व तंत्र पालिकेच्या उद्यानविभागाकडे असल्याबाबत शंका उपस्थित होत आहेत. विकासकामांच्या वेगामुळे शहरातील हिरवाईचे टापूही नष्ट होत आहेत.
आतापर्यंत विविध कामांसाठी हजारो झाडे पुनरेपित करण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरण समितीकडून देण्यात आली आहे. मात्र या झाडांच्या पुनरेपणाबाबत पालिकेने कोणतीही माहिती समितीसमोर आणलेली नाही. एवढय़ा मोठय़ा संख्येने झाडे हलवली जाणार असल्याने त्यांचे पुनरेपण योग्य पद्धतीने होण्यासाठी विशेष अधिकारी नेमला जावा, अशी सूचना वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य व विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली.
त्यांच्या मागणीनंतर समितीचे अध्यक्ष व पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी विशेषाधिकारी नेमण्याचे मान्य केले.

समस्या, निरीक्षण आणि सूचना
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी तानसा जलाशयातून आलेली वाहिनी दुरुस्ती करण्याची गरज आहे. सुमारे शंभर वर्षे जुन्या असलेल्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीत या परिसरातील झाडांमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे या झाडांची कापणी किंवा पुनरेपण करण्याचा प्रस्ताव तानसाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून १४ ऑक्टोबर रोजी आला. त्यानंतर प्राधिकरणातील सदस्यांनी २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान या झाडांची पाहणी केली असता तब्बल १५६६ झाडे हलवणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या प्रस्ताव मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चेसाठी आला.