छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून चार महिन्यांच्या बाळचोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेला न्यायालयाने शनिवारी २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या महिलेने बाळचोरीसाठी त्यावेळेस स्थानकावर उपस्थित असलेल्या एका महिलेची मदत घेऊन त्यासाठी तिला १५ हजार रुपये दिले होते, असे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे बाळचोरीसाठी मदत करणाऱ्या ‘त्या’ महिलेचा शोध घेतला जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
आरोपी महिला ही मानखुर्द येथील रहिवासी असून वैद्यकीय उपचारानंतरही बाळ होत नाही म्हणून नैराश्याच्या गर्तेत गेली होती. पतीची बाळाची इच्छा पूर्ण तिने आधी एका बाळ दत्तक केंद्राला भेट दिली. मात्र तिच्या पदरी निराशा पडली. अखेर तिने बाळचोरीचा कट रचला होता. त्याचवेळी बाळ आपलेच आहे हे पतीला पटावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तिने गरोदर असल्याचे भासवले.  
दुसरीकडे बाळचोरीचा कट अंमलात आणण्यासाठी तिची धडपडही सुरू होती. २३ एप्रिलला तिला सीएसटी स्थानकात फरारी असलेली महिला भेटली. तिने तिला आपली कहाणी सांगितली आणि ‘त्या’ महिलेनेही तिला मदत करण्याची तयारी दाखवली. परंतु त्यासाठी ‘त्या’ महिलेने तिच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली.  
१५ हजारांत आपले काम होऊ शकते म्हणून तिने ‘त्या’ महिलेला तात्काळ मागितलेली रक्कम सोपवली. त्यानंतर फरारी महिलेने बाळ चोरी करून आरोपी महिलेच्या हाती सोपवले व तिथून पळून गेली, असे चौकशीत उघड झाले आहे.
त्यामुळे या महिलेला बाळचोरीसाठी मदत करणाऱ्या ‘त्या’ महिलेचा शोध घेतला जात असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.