क्षयरोग रुग्णालयातील १७ कर्मचाऱ्यांना क्षयाची लागण; महापालिकेच्या योजनांना अद्याप यश नाही
आशियातील सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱ्या शिवडी येथील पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ नये म्हणून पालिकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांना अद्यापही यश आलेले नाही. सध्या इथल्या तब्बल १७ कामगारांना क्षयरोगाची लागण झाली आहे. यापैकी ६ जणांना दुसऱ्यांदा या आजाराची बाधा झाली आहे.
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. परंतु रुग्णालयात रुग्णांबरोबरच डॉक्टर, कर्मचारी यांच्याकरिता पुरेशा सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे येथील कर्मचारीही या आजाराचे बळी पडतात. शिवडीच्या या पालिकेच्या रुग्णालयात २००५ ते २०१६ पर्यंत सुमारे ५० हून अधिक कामगारांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिकेने पौष्टिक आहार, नाश्ता अशा काही सुविधा येथील कर्मचाऱ्यांना पुरविल्या. मात्र तरीही सध्या रुग्णालयातील १७ कर्मचाऱ्यांना या आजाराची बाधा झाली आहे. तीन कामगारांना कामावर रुजू झाल्याच्या पहिल्या तीन वर्षांत या रोगाची लागण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून क्षयरुग्णांना थुंकण्यासाठी स्टीलची थुंकदाणी देण्यात येत आहे. या थुंकदाणीतील थुंकीची विल्हेवाट कर्मचारी लावतात. परंतु, रुग्णालयातील अनेक थुंकदाणींना छिद्र पडली आहेत. त्यावर मलमपट्टी लावून वापरली जात आहेत. सुरुवातीच्या वर्षांमध्ये थुंकदाणीतील विषाणूंचा नाश करण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जात असे. मात्र सध्या ही पद्धत बंद करण्यात आली आहे. रुग्णांच्या खोकल्यातून वा थुंकीतून विषाणू हवेत मिसळतात. त्यामुळे क्षयरोगाची इतर कर्मचारी व डॉक्टरांना लागण होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
२४ महिन्यांच्या सुटीची मागणी
पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये क्षयरोग झालेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांची पगारी सुटी मान्य केली आहे. क्षय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या रोगाची लागण पुन्हापुन्हा होत असते. त्यामुळे, कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुधारेपर्यंत
त्यांना पगारी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच नाही
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या एकूण ६२६ जागा आहेत. परंतु, सध्या केवळ ४४६ कर्मचारी काम करीत आहेत. रुग्णालयात ७५० रुग्ण दाखल आहेत. दर दिवसाला ६ रुग्ण नव्याने दाखल होतात. तर दर दिवशी सहा रुग्ण मृत्युमुखी पडतात. रुग्णांच्या तुलनेत कामगारांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे प्रत्येक रुग्णाकडे लक्ष देणे शक्य होत नाही, असे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ६० ते ८० रुग्णांच्या कक्षात केवळ तीन कर्मचारी काम करतात, जे फारच अपुरे आहेत.

परिचारकांचा व्यवस्थापकीय कामासाठी वापर
रुग्णांच्या सेवेसाठी नेमण्यात आलेल्या ९० कक्ष परिचारकांपैकी ३६ जणांकडून व्यवस्थापनाचे काम करवून घेतले जाते. त्यामुळे उरलेल्या ५४ कक्ष परिचारकांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. या ५४ कक्ष परिचारकांना ९ रुग्णकक्षांमध्ये सेवा देणे कठीण होत आहे. या प्रश्नावर दोन दिवसांपूर्वी येथील कर्मचारी संघटनेने पालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना पत्रही पाठविले होते. व्यवस्थापकीय कामासाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांची बदली रुग्ण कक्षात करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

३३,४४२ क्षयरुग्ण
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत मागील पाच वर्षांत ३३,४४२ रुग्ण क्षयाने दगावले होते. यानुसार प्रत्येक दिवसाला १९ रुग्णांचा मृत्यू होतो.

रुग्णालयात मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे क्षयरोगाची बाधा कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांनाही होत आहे. अनेक कामगारांच्या कुटुंबांनाही क्षयरोगाची बाधा झाली आहे.
– प्रदीप नारकर, अध्यक्ष कामगार संघटना