अॅपल कंपनीच्या iPhone ची क्रेझ लहानांपासून थोरांपर्यंत असली तरी हा फोन विकत घेताना एक विचित्र घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने iPhone विकत घेण्यासाठी खेळण्यातल्या नोटा वापरल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली असून त्याची रवानगी थेट बालसुधारगृहात करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत राहणाऱ्या समीर नागोद्रिया (वय २७) या सायबर क्राईम कन्सलटंटला आपला iPhone7 विकायचा होता. त्यासाठी त्याने वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स साईटवर आपल्या फोनची जाहिरात दिली. या जाहिरातीला प्रतिसाद देत संबंधीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हा फोन विकत घेण्यासाठी इच्छुक असल्याचे नागोद्रिया यांना सांगितले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी मुंबईतील सीएसटीच्या मॅकडोनाल्ड आऊटलेटबाहेर भेटण्याचे त्यांचे ठरले, त्यानुसार त्यांची भेटही झाली.

भेटीवेळी या अल्पवयीन मुलाने समीर यांचा फोन पाहण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांनी फोन त्याच्याकडे दिला. त्याने फोन तपासून पाहिला आणि समीर यांच्याकडे दोन हजाराच्या नोटांचा एक बंडल ठेवला आणि तो फोन घेऊन जायला निघाला. मात्र, नोटा मोजताना त्यांच्या लक्षात आले की, या दोन हजाराच्या नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असून त्यावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिले आहे. त्यानंतर त्यांनी या मुलाला तात्काळ पकडून ठेवले आणि थेट आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये नेले.

हा सर्व प्रकार जाणून घेतल्यानंतर पोलिसांनी या मुलाविरोधात बनावट नोटा वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यानंतर या अल्पवयीन मुलाच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत आपला मुलगा अल्पवयीन असल्याचे सांगत त्याचा वयाचा पुरावा सादर केला. यामध्ये त्याचे १७ वर्षे वय असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे यांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या मुलाने हे खेळण्यातील नोटा ठाण्यातील एका दुकानातून विकत घेतल्या होत्या. iPhone विकत घेण्याची त्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने या खोट्या नोटांच्या बदल्यात फोन विकत घेण्याची योजना आखली. हा मुलगा कल्याणचा रहिवासी असून त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो एका गॅरेजमध्ये काम करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.