ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातील शौचालयामध्ये बुधवारी रात्री झालेल्या स्फोटात १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील तब्बल १८१ शौचालये दाट वस्तीमध्ये असल्याने त्यांची साफसफाई करणारी सक्शन पंपाची गाडीच पोहचू शकत नसल्याने ही शौचालये धोकादायक बनली आहेत. विशेष म्हणजे काही शौचालयांमध्ये आजही माणसांकडून मल काढून घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
लोकमान्य नगरातील पाडा क्रमांक ४ परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या अस्वच्छ सेफ्टिक टँकचा बुधवारी रात्री स्फोट होऊन त्यामध्ये आकाशसिंग या मुलाचा मृत्यू झाला. या शौचालयाच्या बंद टाकीची कित्येकमहिने साफसफाई न झाल्याने गॅसचा दाब वाढून हा स्फोट झाला आहे. शहरात अशी १८१ शौचालये आहेत. याभागामध्ये स्वच्छता करणारी गाडी जाऊ शकत नसल्याची कबुली पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अशी शौचालये धोकादायक बनली असून त्यांचा कधीही स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही सर्व शौचालये स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतला आहे.