राज्यातील १९ हजार ग्रामपंचायतींमध्ये येत्या महिनाभरात ई-बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या गावातील लोकांना ग्रामपंचातयीच्या कार्यालयातूनच बँकिंग व्यवहार करता येतील, अशा प्रकारची व्यवस्था निर्माणकरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
 राज्यात २७ हजार ९९० ग्रामपंचायती असून त्यातील ५५०० ग्रामपंचायतींमध्ये सध्या बँकांच्या शाखा आहेत. तक काही गावांमध्ये बँकांचे विस्तारित कक्ष आहेत. मात्र आजही १८ ते १९ हजार गावांमध्ये कोणत्याही प्रकारची बँकिंग व्यवस्था नाही. राज्य सरकारने सध्या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या असून तेथे संगणकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये बँकींग व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. केंद्र सरकार आणि एका खाजगी कंपनीच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या सिटीझन सव्‍‌र्हिस सेंटर, राष्ट्रीय बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३०० गावांमध्ये ‘बँक ऑफ बडोदा’तर्फे लोकांचे खाते काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून प्रत्येक जिल्हयात तेथील अग्रणी बँकेशी हा करार केला जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
 येत्या महिनाभरात ही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्यांनतर लोकांना ग्रामपंचायत कार्यालयातूनच बँकेत खाते उघडता येईल आणि व्यवहारही करता येईल, तसेच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती याच पध्दतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या जातील, असेही पाटील यांनी सांगितले.