सागरी क्षेत्र राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; नव्याने परवान्यांवर निर्बंध
मत्स्यव्यवसायाच्या संवर्धनासाठी राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील झाई ते बांदादरम्यानच्या चार क्षेत्रांत पारंपरिक मासेमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. यामुळे २ लाख मच्छिमारांना दिलासा मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याशिवाय सागरी किनारपट्टी क्षेत्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास मर्यादा घालण्यात आल्या असून यापुढे यापद्धतीने करण्यात येणाऱ्या मासेमारीसाठी नव्याने परवाने देण्यात येऊ नयेत असे आदेशही त्यात देण्यात आले आहेत.
कोकण सागरी किनारपट्टीवरील झाई ते मुरूड किनाऱ्यापासून १२ सागरी मलापर्यंतचे क्षेत्र हे पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या क्षेत्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मुरूड ते बुरुंडी किनाऱ्यापासून १०मीटर (५ वाव) खोलीपर्यंतचे क्षेत्र, बुरुंडी ते जयगड किनाऱ्यापासून २० (१० वाव) मीटरचे क्षेत्र तर जयगड ते बांदा किनाऱ्यापासून २५ मीटर (१२.५ वाव) खालीपर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापुढील क्षेत्र पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास खुले असेल.
राज्याला ७२० किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी जिल्हांतील ४५६ मासेमारी गावे आहेत. या गावांतील ८१ हजार ४९२ कुटुंबातील तीन लाख ८६ हजार २५९ लोक मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. मासे उतरवण्यासाठी १७३ केंद्र असून त्या माध्यमातून सुमारे ५ लाख मेट्रिक टन मत्स्योत्पादन केले जाते.