मुंबईतील महत्त्वाकांक्षी मुंबई मेट्रो २ व मुंबई मेट्रो ५ हे प्रकल्प मार्गी लागले असून येत्या ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईकरांना दिलासा देणाऱया दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो २ मधील दहीसर पूर्व – डी एन नगर या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. १८ किलोमीटरच्या या मार्गात १७ स्थानके असणार असून यासाठी सुमारे ६, ४१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर मेट्रो ५ मधील अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. १६.५ किलोमीटरच्या मार्गात १६ स्थानके असणार असून या प्रकल्पासाठी ६,२०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रविवारी ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या दोन प्रकल्पांचे भूमीपूजन करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईच्या वाहतुकीला वेगवान करणाऱया या दोन्ही प्रकल्पांचे भूमीपूजन झाल्यानंतर ते रखडू न देता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान येत्या काळात सरकारसमोर असेल.