कुर्ला नेहरूनगर येथे नालेसफाई झाल्यानंतर खचू लागलेली त्याच्या कडेची संरक्षक भिंत बुधवारी पहाटे पूर्णपणे खचल्याने त्याला लागून असलेल्या २० दुकाने नाल्यात कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

नेहरूनगर आणि शिवसृष्टी या दरम्यान असलेल्या नाल्यातील गाळ काढण्याचे काम अलीकडेच पूर्ण झाले होते. मात्र, या काळात नाल्याची एका बाजूची संरक्षक भिंत खचण्यास सुरुवात झाली होती. मंगळवारी सायंकाळपासून अनेक दुकानांच्या मागील बाजूच्या भिंतीस तडे जाऊ लागले. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने लवकर बंद केली. बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास अचानक संरक्षक भिंतीचा भाग खचला आणि त्यावरील दुकाने नाल्यात कोसळली. सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्यामुळे एकापाठोपाठ २० दुकाने नाल्यात कोसळली. दुपारी आणखी काही दुकानांचा भाग नाल्यात कोसळल्याचे सांगण्यात येते. यात दोन हॉटेलचा समावेश आहे. पहाटे ही दुर्घटना घडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. नाल्यातील गाळ काढल्यामुळेच भिंत खचल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वीच या सर्व दुकानांना जागा खाली करण्याबाबत पालिकेने नोटिसा दिल्या होत्या. मात्र, तत्कालीन आमदार मिलिंद कांबळे यांनी त्यास विरोध केला होता. सदर रस्ता रुंदीकरणासाठी प्रस्तावित असून स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी संबंधित नाल्यावरील अधिकृत दुकानांना पालिकेने त्वरित पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे.