रेल्वे परिसर आणि रेल्वे स्थानके यांच्या सुरक्षेसाठी सज्ज होण्यास रेल्वे सुरक्षा दलाने तयारी केली असून मध्य रेल्वेच्या पथकात येत्या सहा महिन्यांत २०० कमांडो दाखल होणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर कमांडोंची संख्या कमी असल्याने सुरक्षाव्यवस्थेवर ताण पडत आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर दहा दिवसांपूर्वीच शीघ्र कृती दलाची स्थापना झाली असून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात तीन नवीन श्वानपथके येणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मुंबईकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
मध्य रेल्वेवर सध्या रेल्वे सुरक्षा दलाचे २४०० जवान तैनात आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात ६०० नव्या जवानांची भर पडली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाची कुमक वाढली आहे. मात्र या दलात कमांडोंचे प्रमाण खूपच कमी असल्याने गंभीर घटनांच्या वेळी इतर जवानांवर जादा ताण पडतो. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलात २०० कमांडोंचा समावेश होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर एकूण १४०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यापैकी २०० कॅमेरे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बसवण्यात आले आहेत. तर, दादर आणि कल्याण या दोन स्थानकांवर प्रत्येकी १०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि ठाणे या स्थानकांवर मिळून आठ ‘बॅग स्कॅनर’ बसवले असून विविध महत्त्वाच्या स्थानकांवर ८० मेटल डिटेक्टरही बसवण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेवर शीघ्र कृती दलाची नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात दहा जवानांचा समावेश आहे.