खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील २०० जागा रद्द

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या वैद्यकीय आणि दंत

रेश्मा शिवडेकर, मुंबई | January 12, 2013 4:19 AM

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश नियम धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्या वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या मिळून सुमारे २०० हून अधिक जागांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेऊन ‘प्रवेश नियंत्रण समिती’ने खासगी शिक्षणसम्राटांना शुक्रवारी चांगलाच दणका दिला. शैक्षणिक वर्ष अध्र्यावर आले असताना खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील इतक्या जागांचे प्रवेश रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे सर्व प्रवेश एएमयूपीएमडीसीच्या दुसऱ्या कॅप फेरीनंतर संस्थास्तरावर करण्यात आले होते. प्रवेशासाठी समितीने नेमून दिलेले वेळापत्रक न पाळणे, रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध न करणे, प्रवेशाकरिता आलेल्या विद्यार्थी-पालकांपासून माहिती लपविणे आदी अनेक कारणांसाठी  न्या. डी. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील ‘प्रवेश नियंत्रण समिती’ने १२ महाविद्यालयांचे सुमारे २०० जागांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रत्येक खासगी महाविद्यालयाला समितीकडून प्रत्येक वर्षी केलेल्या प्रवेशांना मान्यता मिळवावी लागते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांच्या दुसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरताना मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार केल्याच्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तक्रारी होत्या. ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या पालक संघटनेच्या माध्यमातून पालकांनी आपली गाऱ्हाणी समितीसमोर मांडली असता समितीने राज्यातील २६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी करण्यास राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगितले होते. विभागाने नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमून या महाविद्यालयाची चौकशी करून अहवाल प्रवेश नियंत्रण समितीला सादर केला.
या चौकशीत पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने समितीने संबंधित महाविद्यालयांना नोटिसा पाठविल्याने महाविद्यालयांचे धाबे दणाणले होते.
६ जानेवारीला अहवाल सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समितीने १७ महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या. या महाविद्यालयांचे खुलासे १० जानेवारीपर्यंत समितीकडे जमा झाले. यापैकी ज्या महाविद्यालयांचे स्पष्टीकरण समितीला समाधानकारक आढळून आले नाहीत, त्यांचे दुसऱ्या फेरीनंतरचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला.
यांचे प्रवेश रद्द
साताऱ्याचे ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च (३८), सोलापूरचे अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज (७), नवी मुंबईचे तेरणा मेडिकल कॉलेज (१०) वायएमटी दंत महाविद्यालय (१७),  पुण्याचे तेरणा दंत महाविद्यालय (१८), नवी मुंबईचे एमजीएम दंत महाविद्यालय (१८), जळगावच्या गोदावरी फाऊंडेशनचे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज (१९), नाशिकचे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज (९), धुळ्याचे एसीपीएम (२), नागपूरचे एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज (११), अमरावतीचे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज (४), रत्नागिरीतील शिवतेज आरोग्य संस्थेचे योगिता दंत महाविद्यालयाच्या (४१)

First Published on January 12, 2013 4:19 am

Web Title: 200 seat of medical and dental college cancelled