मी तब्बल नऊ वर्षे तुरुंगात होते. या नऊ वर्षांत मी काँग्रेसने रचलेल्या षडयंत्राच्या काळ्या सागराशी संघर्ष केल्यानंतर अन्यायाचा इतिहास रचून तुरुंगातून ‘अर्धमुक्त’ झाली आहे. काँग्रेसच्या षडयंत्रातून माझी मुक्तता झाली आहे, असा आरोप मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने केला आहे. दहशतवादविरोधी पथकाने मला बेकायदेशीररित्या अटक केली होती, असेही तिने म्हटले आहे.

२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तिने आज गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. नऊ वर्षांपासून मी तुरुंगात होते. या काळात मी भावना व्यक्त करू शकली नाही, असे सांगून दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तिने श्रद्धांजली वाहिली. माझ्याविरोधात काँग्रेसने षडयंत्र रचला होता, असा घणाघाती आरोपही तिने केला. काँग्रेसने रचलेल्या षडयंत्ररुपी काळ्या सागराशी संघर्ष केल्यानंतर मी तुरुंगातून अर्धमुक्त झाले आहे. मात्र, कुठेतरी मी मानसिकदृष्ट्या बंधनात राहणार आहे, असेही तिने स्पष्ट केले. मला इतक्या वर्षांनी न्याय दिल्याने मी उच्च न्यायालयाचे आभार मानते, असेही ती म्हणाली.

यावेळी साध्वीने काँग्रेसवर निशाणा साधला. नऊ वर्षे माझ्यावर अन्याय झाला. हा काळ माझ्यासाठी खूपच मोठा आहे. मला अटक करण्यामागे काँग्रेसचा षडयंत्र होता. पण वर्तमानातील हे सरकार षडयंत्र रचणार नाही, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. आता न्यायालयाने मला उपचारांसाठी जामीन मंजूर केला आहे. तूर्तास काँग्रेसच्या षडयंत्रातून माझी मुक्तता झाली आहे, असेही ती म्हणाली. दहशतवादी विरोधी पथकाने मला बेकायदेशीरपणे अटक केली, असेही ती म्हणाली. ‘भगवा दहशतवाद’ हा काँग्रेसने माझ्याविरोधात केलेला कुप्रचार आहे. राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी भगव्या दहशतवादाला घाबरलेच पाहिजे, अशा शब्दांत साध्वीने काँग्रेसवर निशाणा साधला.