मुंबईमधील पवई येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे रविवारी उघडकीस आले. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव जीतेश शर्मा असे असून तो केमिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होता.
चुकीचे क्षेत्र निवडल्याच्या भावनेपोटी आणि अभ्यासात मागे पडल्याने जीतेशने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जीतेशच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत तसे नमूद करण्यात आले होते. जीतेश मूळता रोहतक येथील राहणारा होता. गेले सहा महिने तो प्रचंड तणावाखाली होता. तो संस्थेअंतर्गत असलेल्या वैद्यकीय सुविधेमार्फत उपचारही घेत होता, असे आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जीतेशने लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीतही परीक्षेच्या निकालाची भीती वाटत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, वाईट निकालामुळे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आपल्याला चांगली संधी मिळणार नाही, अशी शंकाही त्याने हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे. २४ आणि २९ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेला तो बसलाही होता. मुळात आपण अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातच यायला नको होते. जेईई ही प्रवेश परीक्षा देऊन आपण चूक केली, अशी कबुलीही त्याने चिठ्ठीत दिली आहे. आधीच्या सत्र परीक्षेत तो काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे, अभ्यासात मागे पडल्याची भावना त्याच्यामध्ये होती, असे त्याच्या एका मित्राने सांगितले.