सर्व सरकारी विभागांमध्ये पोलीस कायमच सॉफ्ट टार्गेट राहिला आहे. पण, पोलिसांना दोष देणाऱ्यांपैकी कितीजणांचा पोलिसांशी प्रत्यक्ष संबंध आलेला असतो, असा सवाल करून मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सर्व गुन्ह्य़ांचे खापर पोलिसांच्या माथी मारण्याच्या वृत्तीचा समाचार घेतला. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी हे महिलांच्या जवळच्या नातेवाईकांपैकी किंवा त्यांच्या परिचयाचे असतात. आपल्या या विधानाच्या पुष्टीसाठी त्यांनी २०१२ मध्ये झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्य़ांची आकडेवारीच सादर केली.
बलात्काराच्या २१९ तक्रारींपैकी केवळ १३ व्यक्ती पिडीताच्या ओळखीच्या नव्हत्या. उर्वरित प्रकरणांमध्ये आरोपी वडील किंवा भाऊ (६), नातेवाईक (९), शेजारी (२६), परिचयाचे (१०८), लग्नाच्या अमिषाने बलात्कार करणारे (५७) होते. घराच्या चार भिंतीत घडणारे हे गुन्हे पोलिसांनी कसे रोखायचे, असा सवाल सिंग यांनी केला.
महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे मूळ कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षाही लोकांच्या मानसिकतेत दडले आहे. मनातली घाण उखडून फेकली तर या प्रकारच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. म्हणूनच शाळा-महाविद्यालयांतून मृत्युंजय हा उपक्रम सुरू करून तरूणतरुणींमध्ये जागरूकता निर्माण करीत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून गुन्ह्य़ाच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या टप्प्यात आम्ही महिला मेळावे घेणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘महिलांवरील लैंगिक अत्याचार – प्रतिबंध आणि लढा’ या विषयावर मुंबई पोलिस आणि एसएनडीटी विद्यापीठाने एकत्रितरित्या जुहू येथील संकुलात आयोजिलेल्या परिसंवादात ते बोलत होते.  महिलांनी छेडछाड किंवा छळवणुकीसंदर्भात तक्रारी पोलिसांकडे नोंदवाव्यात, असे आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त बी. जी. शेखर यांनी यावेळी केले.

पोलीसच अधिक कार्यक्षम!
समाजातील प्रत्येक गैरकृत्यासाठी समाज नेहमी पोलिसांना दोषी धरतो. पण, प्रत्यक्षात सरकारच्या कोणत्याही खात्यातील अधिकाऱ्याच्या तुलनेत पोलीस अधिक कार्यक्षम असतात. कारण, पोलिस सामान्यातल्या सामान्य माणसाशी जितका संवाद साधतो, तितका क्वचितच कुठला सरकारी अधिकारी साधत असेल, असेही मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले.