मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या २०१३-१४ या वर्षांसाठीच्या २२३ कोटी ४६ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेस गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निधीतून मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांत पायाभूत सुविधांबरोबरच विविध विकास कामे हाती घेतली जातील, अशी माहिती उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नसिम खान यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीला उपनगरातील सर्व आमदार, नगरसेवक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या योजनेत सर्वसाधारण योजनेसाठी १६० कोटी, अनुसूचित जातीसाठी ५९ कोटी ९९ लाख आणि आदिवासी उपयोजनेसाठी ३ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या वार्षिक योजनेतून उपनगरातील मोकळ्या शासकीय जमिनींचे संरक्षण करण्यासाठी ५ कोटी २० लाख रुपये खर्च करुन कुंपण बांधण्यात येणार आहे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे. डोंगर उतारावरील दरडी कोसळून अनेकदा अपघात होतात, त्यात जीवित व वित्त हानी होते. असे अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याकरिता ४७ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षांच्या योजनेतून तलावांचे सौंदर्यीकरण करणे, पदपथ, रस्ते दुभाजक, कठडे बांधणे, वाहतूक बेटे, खेळाची मैदाने व मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करणे, जॉगिंग ट्रॅक तयार करणे, पर्यटन स्थळांचा विकास करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती नसिम खान यांनी दिली.