राजकीय सूडभावनेतून विरोधी पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या केल्याप्रकरणी रायगड-रोहा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ कार्यकर्त्यांची जन्मठेप उच्च न्यायालयाने सोमवारी कायम केली.
उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर यांच्या खंडपीठाने आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम केली. २००४मध्ये हे हत्याकांड झाले होते.
रमेश मुंडे या मुख्य आरोपीसह अन्य आरोपी २२ ते ६५ वयोगटातील आहेत. २३ पैकी तीन जण कारागृहात होते. त्यामुळे शिक्षा कायम केल्यानंतर जामिनावरील आरोपींना अलिबाग न्यायालयासमोर शरणागती पत्करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शहादेव नवाशे, शिवराम ओमाले आणि उमाजी ओमाले या तिघांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून हत्या करण्यात आलेल्या तिघांनी पक्ष सोडल्याने त्याचा सूड म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली होती.
न्यायालयाने सरकारी वकील जितेंद्र देढिया यांनी या प्रकरणी केलेला युक्तिवाद मान्य करत कनिष्ठ न्यायालयाने आरोपींना सुनावलेली शिक्षा योग्य ठरवली. घटनेच्या दिवशी सहदेव हा नैसर्गिक विधीसाठी केला असता आरोपींनी त्याला मारहाण केली. भाऊ शिवराम याने याची माहिती सहदेवच्या पत्नीला दिली. त्यानंतर ती अन्य गावकऱ्यांसह घटनास्थळी पोहोचली.त्या वेळी सहदेवला वाचविण्यासाठी कुणी पुढे आले तर वाईट परिणाम होतील असे आरोपींकडून धमकावण्यात आले. मात्र आरोपी आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात सहदेव आणि शिवराम यांचा जागीच, तर उमाजी याचा रुग्णालयात मृत्यू झाला. सहदेवच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी आरोपींना अटक केली.