पालिकेने देखभालीसाठी खासगी संस्था, कंपन्या, शाळांना दिलेली आणखी २४ मैदाने आणि उद्याने बुधवारी ताब्यात घेतली. आता एकूण ६० मैदाने, उद्याने पालिकेच्या ताब्यात आली आहेत. मुंबईतील पालिकेची उपवने, उद्याने, खेळाची आणि मनोरंजन मैदाने पालिकेने खासगी संस्था, शाळा, कंपन्या, संघटनांना दत्तक देण्याच्या प्रशासनाच्या धोरणावर पालिका सभागृहाने शिक्कामोर्तब केले होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत या धोरणास स्थगिती दिली. तसेच यापूर्वी संस्था, शाळा, संघटना, कंपन्यांना दिलेली २१६ मैदाने, उद्याने ताब्यात घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्तांनी नोटीस बजावून पहिल्या टप्प्यात ३६ मैदाने, उद्याने ताब्यात घेतली होती.