हँकॉक पूल पाडकामामुळे उपनगरीय गाडय़ा भायखळा, तर हार्बर गाडय़ा वडाळ्यापर्यंत

ब्रिटिशकालीन मुंबईतील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला हँकॉक पूल जुना झाल्याने पाडण्यात येणार आहे. याबाबत रेल्वेने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. महापालिकेने परवानगी दिल्यानंतर आता रेल्वे हा पूल पाडण्यासाठीचे नियोजन करीत आहे. मात्र पूल पाडण्यासाठी रेल्वेला तब्बल २४ तासांचा जंबो ब्लॉक घ्यावा लागणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत गाडय़ा येणे शक्य नसल्याने अनेक गाडय़ा रद्द राहणार असून उपनगरीय व मुख्य मार्गावरील गाडय़ा दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, भायखळा आणि वडाळा या स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. हा जंबो ब्लॉक कधी घ्यायचा, त्याचे नियोजन कसे करायचे, याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी होणार आहे.

मध्य रेल्वेमार्गावर डीसी-एसी परिवर्तनादरम्यान हँकॉक पुलाजवळ प्रचंड तांत्रिक समस्या उद्भवल्या होत्या. या पुलाची उंची कमी असल्याने डीसी-एसी परिवर्तनासाठी ओव्हरहेड वायर आणि पूल यांच्यात योग्य जागा मिळत नव्हती. परिणामी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सर्व गाडय़ांना या भागात ताशी १५ किलोमीटर एवढी वेगमर्यादा घालून दिली होती. त्या वेळीही मध्य रेल्वेने महापालिकेकडे हा पूल पाडण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र तेव्हा निर्णय होऊ शकला नाही.

आता मुंबई महापालिकेनेही हा पूल पाडण्याची परवानगी रेल्वेला दिली आहे. हा पूल पाडण्याचे महत्त्वाचे काम रेल्वेला करायचे आहे. त्यासाठी रेल्वेला २४ तासांचा जंबो ब्लॉक घ्यावा लागणार आहे. हा ब्लॉक घेतला असता मध्य तसेच हार्बर मार्गावरील गाडय़ा भायखळा आणि वडाळा यांच्यापुढे येणे शक्य नाही. परिणामी ब्लॉकच्या दिवशी २४ तास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरीय गाडय़ा भायखळ्यापर्यंत चालवल्या जाणार आहेत. तर हार्बर मार्गावरील गाडय़ा वडाळा येथे थांबवून मागे वळवल्या जातील. दरम्यान, हँकॉक पुलासोबत मसजिद-सीएसटीजवळील कारमॅक पुलाचेही पाडकाम एकाच जंबो ब्लॉकमध्ये करण्यात येण्याची शक्यता आहे.

नियोजनासाठी आज बैठक
लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीही मध्य रेल्वेला विशेष नियोजन करावे लागणार आहे. या जंबो ब्लॉकदरम्यान कोणकोणत्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करायच्या, कोणत्या गाडय़ा कुठे थांबवून मागे वळवायच्या; याचे नियोजन होणे आवश्यक आहे. या गाडय़ांपैकी काही गाडय़ा दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर थांबवण्यात येतील. याबाबतची बैठक मंगळवारी घेणार असून त्यात निश्चित नियोजन होईल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.