देवनार कचराभूमी वीजप्रकल्प अहवाल सादर; एक हजार कोटी रुपये खर्च करून वीजप्रकल्प
देवनार येथील कचऱ्यातून वीजप्रकल्प तयार करता येईल, असा अहवाल टाटा कन्सल्टिंगने महापालिकेला सादर केला आहे. दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २५ मेगावॉट वीजनिर्मिती होईल, असा अंदाज आहे. शहराला दररोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॉट वीज लागते. या प्रकल्पासाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून पर्यावरण, सीआरझेड अशा परवानगीही आवश्यक असतील.
देवनार कचराभूमीला जानेवारीपासून तीन वेळा प्रचंड आग लागल्या होत्या. २० ते २५ मीटर उंचीच्या कचऱ्याच्या ढिगांना लागलेली आग विझवण्यासाठी प्रत्येक वेळी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. या धुरामुळे शहराची हवा निकृष्ट झाली होती. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही कचऱ्याच्या समस्येबाबत पालिकेला तातडीने उपाय योजण्याची सूचना केली होती. त्यानंतर कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उपाय सुचवण्यासाठी महानगरपालिकेने टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने कचऱ्याच्या विल्हेवाटीवरील अहवाल सादर केला असून कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबवणे शक्य असल्याचे म्हटले आहे.

या अहवालानुसार जागतिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २५ ते ३० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकेल.
देवनार कचराभूमीचा आकार १२० हेक्टर असून या प्रकल्पासाठी १४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास तो देशातील आजवरचा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प असेल. मात्र या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येईल.
हा प्रकल्प सुमारे २५ वर्षे कार्यान्वित राहू शकेल. या प्रकल्पासाठी ऑगस्ट महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत कार्यादेश काढले जातील, असा अंदाज आहे.