देशभरातील व्यग्र आणि नेहमीच हाऊसफुल्ल असलेल्या मार्गावरील गाडय़ांच्या डब्यांची संख्या २४ वरून २६ करू, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केल्यानंतर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या जादाच्या दोन डब्यांची आस लागली आहे. मात्र मध्य आणि कोकण रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे प्लॅटफॉर्म २६ डब्यांसाठी योग्य नसल्याने या प्लॅटफॉर्मची लांबी वाढेपर्यंत कोकण मार्गावर २६ डब्यांच्या गाडय़ा धावण्याची चिन्हे नाहीत.
कोकण रेल्वेमार्गावरील गाडय़ा जवळपास १२ महिने भरून जातात. गणपती, होळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत तर या गाडय़ांची प्रतीक्षा यादी हजारांच्या घरात जाते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना नवीन गाडय़ांची घोषणा केली नसली, तरी उत्तम प्रतिसादात चाललेल्या गाडय़ांच्या डब्यांची संख्या दोनने वाढवून ती २६ करण्यात येईल, असे जाहीर केले. कोकण रेल्वेमार्गावरील मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेस या दोन्ही गाडय़ा २४ डब्यांच्या असून या गाडय़ांचे आरक्षण वर्षभर फुल्ल असते. कोकणातल्या जवळपास सर्वच गाडय़ांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. असे असताना, कोकणात जाणाऱ्या या गाडय़ांच्या डब्यांच्या संख्येत आणखी दोन डब्यांची भर पडेल, हा विचार म्हणजे प्रवाशांचा भ्रम ठरणार आहे. गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवली, तर त्या घाट, बोगदे किंवा पूल यांवरून जाण्यात काहीच अडचण येणार नाही, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर या गाडय़ा कशा थांबवणार, हा प्रश्न असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
मध्य रेल्वे व कोकण रेल्वेवरील अनेक स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी अद्याप २४ डब्यांच्या गाडीसाठीही अपुरी आहे. या स्थानकांवर एक तर गाडी दोन वेळा थांबवावी लागेल किंवा प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागेल. त्यामुळे या प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्याशिवाय कोकण मार्गावरील गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही लांबी वाढवण्यासाठी किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच या डब्यांच्या संख्येबाबत विचार होऊ शकेल.

गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवली, तर त्या घाट, बोगदे किंवा पूल यांवरून जाण्यात काहीच अडचण येणार नाही, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर या गाडय़ा कशा थांबवणार हा प्रश्न आहे.