गेले आठवडाभर पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली असताना राज्यातील जलाशयांमध्ये आतापर्यंत २६ टक्के साठा झाला आहे. अन्य विभागांमध्ये परिस्थिती फारशी चिंताजनक नसली तरी मराठवाडय़ात एकूण क्षमतेच्या फक्त सात टक्केच साठा आतापर्यंत झाला आहे.
जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे जलाशयांमधील परिस्थिती सुधारली आहे. आतापर्यंत कोकणात एकूण क्षमतेच्या ४८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. नागपूर (२७ टक्के), अमरावती (३३ टक्के) नाशिक (२१ टक्के), पुणे (३० टक्के) तर मराठवाडय़ात फक्त सात टक्के साठा झाला आहे. राज्यात गेल्या वर्षी याच कालावधीत जलाशयांमध्ये १८ टक्केच साठा होता तर त्याच्या मागील वर्षी (२०१३) २९ टक्के साठा झाला होता.
मराठवाडय़ातील जायकवाडी या धरणात फक्त एक टक्के साठा शिल्लक आहे. तेरण्यात राखीव साठय़ाचा वापर करावा लागत आहे. सूर्या (३६ टक्के), तिलारी (४१ टक्के),  विष्णुपुरी (१९ टक्के), भातसा (३५ टक्के), वैतरणा (२७ टक्के), कोयना (४६ टक्के), मोडकसागर (४८ टक्के), तानसा (३० टक्के), विहार (२९ टक्के), तुळशी (६३ टक्के) तलावात पाण्याचा साठा झाला आहे.
दुबार पेरणीचे संकट
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग आनंदित झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दिलेल्या ओढीने राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. चिंतातुर शेतकरी पावसाच्या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसले असल्याचे चित्र आहे.
या आठवडय़ात पाऊस?
भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या आठवडय़ात कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात या आठवडय़ात पावसाची लक्षणे नाहीत. मध्य महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता नाही.