राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी २६/११ तपासासंदर्भातील माहिती लपविल्याची शंका व्यक्त केली आहे. मुंबईवर २६/११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यावेळी पोलीसांच्या वायरलेस यंत्रणेद्वारे करण्यात आलेल्या संभाषणांच्या माहितीबाबत  दिशाभूल केल्याचा ठपका मारिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामध्ये २६/११ हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि पोलीस नियंत्रण कक्ष यांच्यात झालेल्या वायरलेस संभाषणाचा समावेश आहे. गायकवाड यांच्याकडून राज्य सरकारला नुकत्याच देण्यात आलेल्या आदेशांनुसार, २६/११ सारख्या महत्वपूर्ण प्रकरणात तपास पथकांची अशाप्रकारे दिशाभूल का करण्यात आली, याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती नेमण्यास सांगण्यात आले आहे.
वायरलेस संभाषणाचे तपशील सादर करताना त्यातील काही भाग नष्ट करून माहितीमध्ये फेरफार करण्यात आल्याचे, मुख्य माहिती अधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच यासंदर्भात त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी २००९ मध्ये २६/११ हल्ल्याच्यावेळी दक्षिण मुंबईतील पोलीस वायरलेस यंत्रणेवर झालेल्या संभाषणाचे तपशील मिळविण्यासाठी माहिती अधिकारातंर्गत याचिका दाखल केली होती. सुरूवातीला मुंबईच्या गुन्हे विभागाचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी विनिता कामटे यांना माहिती देण्यास नकार दिला होता. मात्र, सतत पाठपुरवठा केल्यानंतर नोव्हेंबर २००९ आणि फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांना ही माहिती देण्यात आली होती. त्यावेळी या संभाषणांमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसली, तरी गायकवाड यांनी दिलेल्या आदेशांमुळे राकेश मारिया यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.