कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. या २७ गावांची मिळून नवीन नगरपालिका करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सोमवारी याबाबतचा आदेश काढण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला झटका दिला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महापालिका हद्दीत शिवसेनेच्या तुलनेत भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वतंत्र्यपणे लढवाव्यात, असा सूर भाजपचे स्थानिक नेते आळवू लागले. राज्यातील वरिष्ठ नेत्यांची त्यांना साथ असल्याचे चित्र आहे. २७ गावांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवल्याची चर्चाही रंगली होती. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनुसार या गावांमध्ये तब्बल २१ प्रभागांची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक असल्याने गावांचा समावेश महापालिका हद्दीत व्हावा, यासाठी शिवसेना नेते अगदी सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र, महापालिका निवडणूक स्वतंत्र्यपणे लढली गेल्यास या गणितांचा पक्षाला फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने भाजपचे स्थानिक नेते गावे वगळण्यासाठीच्या संघर्ष समितीची साथ करू लागले होते.