नियमबाह्य़रीतीने गणित विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या मुंबईतील २९९ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. दहावीला सामान्य गणित घेऊन पास झालेल्या या विद्यार्थ्यांना बारावीला गणित विषय घेऊन परीक्षा देता येत नाही. असे असताना यांना प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.

दहावीच्या परीक्षेत गणिताचा बागुलबुवा वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणित हा पर्यायी विषय शासनाने उपलब्ध करून दिला. हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र बारावीचे काठिण्यपातळीचे गणित जमणे शक्य नाही. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना बारावीला गणित विषय अभ्यासाला घेण्यास मज्जाव करण्यात आला. मुंबईमधील २९९ विद्यार्थ्यांनी नियमबाह्य़ रीतीने बारावीला गणित विषयाची परीक्षा दिली असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने उघडकीस आणले आहे. सामान्य गणित विषय घेऊन दहावी पास झालेल्या या विद्यार्थ्यांना गणित विषय अभ्यासण्याची परवानगी नसतानाही नियमबाह्य़ प्रवेश देणाऱ्या मुंबईमधील १६७ महाविद्यालयांना मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याबाबतचा खुलासा मंडळाकडे करण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले होते. नोटीसनुसार आलेले १०० महाविद्यालयांचे खुलासे व त्यासंबंधीचा प्रस्ताव मंडळाने शासनाकडे पाठविले आहेत. याबाबतचा निर्णय ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. शासनाने घेतलेला निर्णयानुसार या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची अंमलबजावणी मंडळाकडून करण्यात येणार आहे.

३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर वेळेत निर्णय न झाल्यास मात्र २९९ विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल राखून ठेवले जाणार आहेत.

दहावीला सामान्य गणित घेऊन पास झालेला विद्यार्थी बारावीला गणित विषय घेऊन परीक्षेला बसू शकतो. त्यासाठी दहावीनंतरच्या दोन वर्षांमध्ये उच्च गणित विषय पास होणे गरजेचे आहे. तेव्हा महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांचे बारावीचे परीक्षा अर्ज भरताना या गोष्टी तपासून पाहणे आवश्यक होते. परंतु महाविद्यालयांच्या बेपर्वाईमुळे मात्र मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. नोटीस पाठविलेल्या १६७ पैकी ६७ महाविद्यालयांनी खुलासेच मंडळाकडे पाठविले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांनी या मुलांची जबाबदारी झिडकारून त्यांचे भवितव्य अंधारातच ठेवले असल्याचे समोर आले आहे.