बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी याप्रकरणी इमारतीच्या पर्यवेक्षकासह तिघांना अटक केली आहे.
 लोअर परळ येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ही विवाहित तरुणी मजुरीकाम करत होती. याच इमारतीत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद निसारउद्दीन (२७) हा तिला कांदिवलीत दुसऱ्या ठिकाणी काम मिळवून देतो असे सांगून घेऊन गेला. त्याच वेळी त्याने अन्य तीन साथीदारांना बोलावून घेतले होते. हे अन्य तिघेही बांधकाम मजूर म्हणून काम करतात. कांदिवली येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेऊन निसारउद्दीनने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कमाल बिलाल हसन (२३), मोहम्मद इस्लाम (२०) आणि अन्य अशा तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. हे सर्व बांधकाम मजूर या तरुणीच्या आणि तिच्या पतीच्या परिचयाचे होते. या घटनेनंतर भेदरलेल्या या तरुणीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. ती आठवडाभर गप्प बसली होती. मात्र तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तिच्या पतीसोबत जाऊन तिने तक्रार दाखल केली.
चौथ्या फरारी आरोपीचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय पाटणकर यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी तरुणीचे कपडे पोलिसांना मिळाले आहेत. ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.