विकलेल्या व्यावसायिक गाळ्याचा ताबा न देता कुख्यात गुंड छोटा शकीलच्या नावाने धमकी देणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक आरोपी छोटा शकीलचा हस्तक असून, तो १९९३चे मुंबई स्फोट, जेजे रुग्णालयातील गोळीबारामध्येही सहभागी होता.
दक्षिण मुंबईत व्यवसाय असलेल्या एका व्यावसायिकाने मशीद बंदर येथे एक व्यावसायिक गाळा फेब्रुवारी २०१४ मध्ये १.२५ कोटी रुपयांना विकत घेतला होता. महिन्याभरात गाळ्याचा ताबा देण्याचे फैजल जुनेजा (३०), हनीफ शेख (४५) यांनी मान्य केले होते. महिन्यात गाळ्याचा ताबा न मिळाल्याने व्यावसायिकाने दोघांकडे तगादा लावण्यास सुरुवात केली. पण दोघेही एप्रिल २०१६ पर्यंत व्यावसायिकाला टाळत होते. अखेर, व्यावसायिकाने फैजल जुनेजाच्या वडिलांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्या वेळी जुनेजाच्या वडिलांनी तुम्हाला छोटा शकीलचा फोन येईल, त्यानेच हा गाळा विकू नये असे सांगितल्याचे व्यावसायिकाला म्हणाले. २० मे रोजी जुनेजा आणि शेख याच्यासह छोटा शकीलचा हस्तक मोहम्मद अहमद मन्सूरी ऊर्फ अहमद लंगडा तिघे व्यावसायिकाच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात गेले. जुनेजा आणि शेख छोटा शकीलच्या जवळचे असून गाळा परत मागितला तर एक कोटी रुपये द्यावे लागतील नाही तर शकील गोळ्या घालेल, अशी धमकी लंगडाने दिली.

अपघातात चार मुलांसह पाच जण जखमी
ठाणे: घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड नाका परिसरात गुरुवारी रात्री मोटारसायकल अपघात होऊन पाच जण जखमी झाले.
भरधाव मोटारसायकलने तीन मुलांना धडक दिली. अपघातात मोटारसायकलस्वार आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा मुलगाही जखमी झाला आहे. जखमी झालेली मुले ११ ते १४ वयोगटातील असून त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.