बंदी असलेल्या अतिघातक ‘एमडी’ म्हणजे मॅफ्रेडॉन या अमली पदार्थाचा व्यवहार मुंबई शहरात राजरोसपणे सुरू आहे. मंगळवारी दहशतवाद विरोधी पथकाच्या चारकोप शाखेने तब्बल १५० किलो अमली पदार्थ जप्त केले असून चार आरोपींना याप्रकरणी अटक केली आहे. या अमली पदार्थाची किंमत ३० कोटी रुपये आहे.
अमली पदार्थ विरोधी आठवडा सुरू असल्याने राज्य दहशतवाद विरोधी पथक अमली पदार्थाच्या छुप्या व्यवहाराचा शोध घेत होते. सोमवारी ओशिवराच्या एकदंत इमारतीत काही जण एमडी अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या चारकोप शाखेने छापा घातला. त्यांच्याकडून तयार आणि कच्च्या स्वरूपातला १५० किलो एमडीचा साठा जप्त करण्यात आला. या आरोपींच्या घरी गोपनीय पद्धतीने एमडी तयार करण्यासाठी असलेला कारखाना आढळून आला. तेथून एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.