गेल्या आठवडय़ात उपनगरीय गाडीची देखभाल-दुरुस्ती कशी होते, त्याचे वेळापत्रक कसे असते, ते आपण पाहिले. पण गाडी कारशेडमधून बाहेर येताना तिची साफसफाई आणि स्वच्छता, हे कामदेखील याच देखभाल-दुरुस्तीच्या सहा-आठ तासांमध्ये केले जाते. दर दिवशी एका गाडीत किमान ८० हजार हातांनी केलेली घाण रेल्वे कर्मचाऱ्यांचे ३२० हात केवळ सहा तासांत साफ करण्याची कसरत करतात, याची माहिती बहुतेकांना नसते..

प्रसंग पहिला

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

ठिकाण – उपनगरीय गाडीतील डबा

वेळ – सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र.. (थोडक्यात कोणतीही)

मुंबईच्या लोकल संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले एखादे टोळके दरवाजात उभे असते किंवा अगदी समोरासमोरच्या दोन आडव्या आसनांवर बसले असते. त्यांच्यात चालणाऱ्या नेहमीच्या गप्पा, भंकस वगरे यथास्थित चालू असते. त्या टोळक्यातले किमान दोन जण तोंडात मस्त मावा जमवून बसलेले असतात. एवढय़ात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होते आणि त्या दोघांनाही आपले मत व्यक्त करण्याची खुमखुमी येते. दरवाजात उभे असले, तर बिनदिक्कत दरवाजाच्या फटीत पिंक टाकली जाते आणि आसनावर बसले असले, तर खिडकीच्या बाहेर किंवा तशीच आसनाखालच्या कोपऱ्यात सणसणीत पिंक टाकून बाहीने लाळ पुसून हिरिरीने आपले मत मांडले जाते..

प्रसंग दुसरा

ठिकाण – तोच नेहमीचा फक्त महिलांसाठीचा डबा

वेळ – संध्याकाळी घरी परतताना..

ऑफिसमधून थकून आलेल्या बायका एकमेकींशी गप्पा मारता मारता स्टेशनबाहेरच्या भाजीवाल्याकडून घेतलेली भाजी निवडत असतात. प्रवासातला वेळ तेवढाच सत्कारणी लागावा आणि घरी गेल्यावर थोडे काम वाचावे, हा दुहेरी हेतू! निवडलेली चांगली भाजी पिशवीत टाकली जाते आणि बाकीची साले, टरफले वगरे आसनाखालच्या जागेत विराजमान होतात..

तुम्हा-आम्हा मुंबईकरांच्या आयुष्यात सर्रास घडणारे हे प्रसंग! आपल्या लेखी एकदा मागे वळून पाहावे, असे या प्रसंगांमध्ये काहीच नाही. पण या प्रसंगांमुळे मुंबईकर रेल्वेतल्या अनेकांना नोकऱ्या देऊन त्यांचा संसार चालवण्यास नकळत मदत करत आहेत. यात स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासारखे काहीच नाही. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन दर दिवशी मुंबईकर यथाशक्ती खराब करत असतात. तरीही दुसऱ्या दिवशी त्यांच्या वाटय़ाला येणारी गाडी त्यांना साफ, स्वच्छ आणि चकचकीतच लागते. अनेकदा ती तशीच असते. पण त्यासाठी कारशेडमध्ये झटणारे अनेक हात असतात, हे विसरून चालणार नाही.

उपनगरीय गाडी साफ करण्याचे तीन टप्पे आहेत. ड्राय सोपिंग, मॉपिंग व वॉशिंग! अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले, तर घरातला कचरा जसा दर दिवशी काढला जातो त्याचप्रमाणे गाडय़ांमधील कचराही दर दिवशी काढलाच जातो. रात्री गाडय़ा स्टेबिलग लाइनला गेल्या की, हे कामही केले जाते. त्यामुळेच दर दिवशी प्रवाशांच्या सेवेत येणारी गाडी स्वच्छ दिसते.

त्यापुढील टप्पा म्हणजे मॉपिंग किंवा गाडी पुसून काढणे! हा टप्पा दर पाच दिवसांनी येतो. या टप्प्यात प्रत्येक डब्याच्या आतमधून गाडी पाण्याचा वापर करून पुसून काढतात. याच टप्प्यात पंख्यांवर बसलेली जळमटेही साफ केली जातात. संपूर्ण गाडीची साफसफाई करण्यासाठी दोन-दोन जणांचे चार गट काम करत असतात. एक डबा पूर्ण साफ करण्यासाठी साधारण ४० मिनिटांचा अवधी लागतो. त्यामुळे पूर्ण गाडीचे मॉपिंग करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. उपनगरीय गाडी दर दिवशी खराब होतेच होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाडी बाहेरून पुसण्यासाठी कमी कष्ट लागत असले, तरी अनेकदा दमट हवेमुळे आतील धूळ चिकट होते. त्यामुळे त्यावर जास्त मेहेनत घ्यावी लागते. मुंबईकरांनी दरवाजाच्या सांदिकोपऱ्यात किंवा आसनांखाली मारलेल्या रंगीत पिचकाऱ्यांचा निकालही या मॉपिंग टप्प्यातच लावला जातो. त्यासाठी एक माणूस १२ डब्यांच्या गाडीच्या प्रत्येक दरवाजाची साफसफाई करतो. हे डाग वाळल्यानंतर ते गाडीच्या रंगावर अगदी पक्के बसतात. ते काढण्यासाठी खास रसायनाचा वापर करावा लागतो. हे डाग काढणे हे या कर्मचाऱ्यांसाठी खूप कष्टप्रद असते. गाडीत लागलेल्या अनेक अनधिकृत जाहिरातीदेखील याच मॉपिंगदरम्यान काढून टाकल्या जातात.

गाडीचे वॉशिंग हा या साफसफाईमधील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. त्यासाठी तेवढा जास्त वेळही दिला जातो. दर १४ दिवसांनी गाडी कारशेडमध्ये आणून साग्रसंगीत धुतली जाते. गाडी आतून आणि बाहेरून धुण्यासाठी रेल्वेकडे खास धुलाई यंत्रे आहेत. आतील यंत्रांमधील जेट स्प्रेद्वारे डब्याच्या कानाकोपऱ्यातील धूळ साफ केली जाते. तसेच डब्यात असलेला पायाखालचा पत्राही व्यवस्थित साफ केला जातो. तर गाडी बाहेरून धुण्यासाठी धुलाई यंत्रावर पाठवली जाते. गोल गोल फिरणारे स्पंजसारखे अनेक उभे दांडे, त्यावर पडणारे साबणाचे पाणी आणि त्यानंतर तो साबण धुऊन काढण्यासाठी असलेली पाण्याची आंघोळ अशा तीन टप्प्यांत गाडी धुऊन निघते.

गाडी धुण्यासाठीदेखील कमीत कमी सहा तासांचा कालावधी लागतो. यात प्रत्येक डब्यासाठी अर्धा तास दिला जातो. या अध्र्या तासाच गाडी अंतर्बाह्य़ धुऊन निघते. त्यासाठी कारशेडमधील एकूण १६० कर्मचारी एकाच वेळी कामाला लागलेले असतात.

उपनगरीय गाडय़ा या मुंबईकरांच्या सेवेसाठी चालवल्या जातात. एका गाडीतून एका फेरीत गर्दीच्या वेळी साधारण किमान साडेचार हजार प्रवासी प्रवास करतात. अशा दहा ते १२ फेऱ्या प्रत्येक गाडी दर दिवशी मारते. म्हणजेच एका गाडीतून तब्बल ५० हजार लोक दर दिवशी प्रवास करतात. म्हणजे दर दिवशी किमान एक लाख हात गाडी घाण करण्यासाठी सज्ज असतात. या एक लाख हातांपकी साधारण ८० हजार हात आणि ३५-४० हजार तोंडे या ना त्या कारणाने दर दिवशी गाडी घाण करण्याचे काम अव्याहत पार पाडत असतात. त्यांनी केलेली घाण साफ करण्यासाठी रेल्वेकडे मात्र फक्त १६० गुणिले दोन म्हणजे ३२० हात आणि सहा तास एवढाच अवधी असतो. ८० हजार हातांनी दिवसभर केलेली घाण साफ करण्यासाठी या ३२० हातांना सहा तास पुरणार तरी कसे? तरीही, रेल्वेचे हे सफाई कर्मचारी ही असमान लढाई दर दिवशी लढत असतात. त्या ३२० हातांना उरलेल्या एक लाख हातांची मदत मिळाली तर?

रोहन टिल्लू –  rohan.tillu@expressindia.com

@rohantillu