सर्वाधिक वृद्ध केरळमध्ये तर अरुणाचलातील लोकसंख्या सर्वाधिक तरुण
६० वर्षांहून अधिक वय असलेल्या भारतीयांची संख्या आतापर्यंतची सर्वात जास्त झाली असून, देशाच्या १२१ कोटी लोकसंख्येच्या ८.६ टक्के लोक ‘ज्येष्ठ नागरिक’ असल्याचे ताज्या अधिकृत आकडेवारीतून दिसत आहे.
साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या २००१ साली ७.६ कोटीवरून २०११ साली १०.३ कोटी इतकी वाढली असून ही वाढ ३५.५ टक्के असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. १९५० सालापासूनचा हा विक्रमी उच्चांक असून, एकूण लोकसंख्या ज्या दराने वाढली त्यापेक्षा तो जवळजवळ दुप्पट आहे. २००१ ते २०११ याच काळात देशाची एकूण लोकसंख्या १७.७ टक्के दराने वाढल्याचेही या अधिकृत आकडेवारीवरून दिसून येते.
वृद्धत्व हा भविष्यातील मोठा सामाजिक बदल म्हणून समोर येईल असे लोकसंख्यावाढीचा हा कल पाहून स्पष्टपणे लक्षात येते, असे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातील महासंचालक (केंद्रीय सांख्यिकी अधिकारी) अमरजीत कौर यांनी सांगितले.
६० वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धांचे सर्वात जास्त प्रमाण असलेले राज्य केरळ असून तेथे हे प्रमाण लोकसंख्येच्या १२.६ टक्के आहे. याउलट वृद्धांचे सगळ्यात कमी, म्हणजे ४.६ टक्के प्रमाण अरुणाचल प्रदेशमध्ये असून त्याखालोखाल मेघालयचा (४.७ टक्के) क्रमांक लागतो.
भारताचे वय उत्तरदायित्व गुणोत्तर प्रमाणातदेखील (एज डिपेन्डन्सी रेशो) वाढत असून २००१ सालच्या १०.९ पासून सध्या ते १४.२ इतके झाले आहे. उत्तरदायित्व गुणोत्तर म्हणजे ६४ वर्षांहून अधिक वय असलेल्या वृद्धांचे १५ ते ६४ वर्षांदरम्यानच्या कार्यक्षम मानल्या जाणाऱ्या वयोगटाच्या तुलनेत असलेले प्रमाण होय. याच्या अगदी उलट, वृद्धांचे प्रमाण अधिक असलेल्या जपानमध्ये डिपेन्डन्सी रेशो ४२ इतका जास्त आहे.