लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली, परंतु डॉ. आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडनमधील ते घर खरेदी करण्यासाठी दलित विकास निधीतील ३७ कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. खर्चाचा विषय आल्यानंतर हे सारे प्रकरण आता सामाजिक न्याय विभागाच्या गळी उतरविण्यात आले आहे.  
अलीकडेच लंडनमध्ये शिक्षण परिषदेसाठी विनोद तावडे गेले असता, त्यांनी त्या वास्तुला भेट दिली. ही वास्तु खरेदी करुन बाबासाहेबांचे स्मारक म्हणून ते जतन करण्याची घोषणा त्यांनी केली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही वास्तू खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यासाठी आता दलित विकास निधीचा वापर केला जाणार आहे. १४ एप्रिलपर्यंत ही वास्तु ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे  सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ही वास्तू खरेदी करण्यासाठी अंदाजे ३७ कोटी रुपये लागणार असून अनुसूचित जाती उपयोजनेतून ते खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.