कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट यांनी शेतकऱ्यांसह राज्यातील  सत्ताधारी पक्ष त्रस्त असतानाच राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी असल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. परिणामी आगामी काळात शेती, उद्योग आणि पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून असा गंभीर प्रश्न सरकारपुढे निर्माण होणार आहे. गेल्या वर्षी याच वेळी प्रमुख धरणांमधील पाणीसाठी ४८ टक्के होता तो आज घडीला ३७ टक्के एवढाच शिल्लक आहे. राज्यातील सर्व मोठी धरणे व प्रकल्पात २३ मार्च २०१५ रोजी ११,३८० दशलक्ष घनमीटर एवढय़ा पाणीसाठय़ाची नोंद असून गेल्या वर्षी याच दिवशी १३,२६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.
’मराठवाडा
मराठवाडय़ात एक हजार फूट खोल बोअर घेतल्यावर पाणी लागत असून तेही थोडय़ा काळानंतर बंद होते. मराठवाडय़ातील जायकवाडी, ऊध्र्व पेनगंगा, माजलगाव, पूर्णा, मांजरासह चौदा धरणांमध्ये २३ मार्च रोजी पाणीसाठा ८९४ दशलक्ष घनमीटर एवढा असून गेल्या वर्षी याच दिवशी १९१८ दशलक्ष घनमीटर एवढा होता.
’विदर्भ
नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह, निम्न वेणा, इटियाडोह भंडारा, बोर, गोसीखुर्द अशा सोळा धरण व प्रकल्पात १०६५ दशलक्ष घनमीटर एवढा साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच वेळी १७७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.
’पुणे
पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर येथील २७ पाणी प्रकल्पांमध्ये ३९१८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ४३१३ दशलक्ष घनमीटर एवढे होते.
’अमरावती
अमरावती विभागातील नऊ प्रकल्पांमध्ये ५१३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून गेल्या वर्षी हेच प्रमाण ७४० दशलक्ष घनमीटर होते.
’कोकण
कोकणातील तीन मोठय़ा प्रकल्पांमध्ये ३७८ दशलक्ष घनमीटर एवढा साठा होता तर गेल्या वर्षी याच दिवशी ४०७ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता.
नाशिक
नाशिक, अहमदनगर व जळगाव येथील एकूण अठरा पाणी प्रकल्पांमध्ये १२३१ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच प्रकल्पांमध्ये १३६० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होता.
ठाणे-मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ाचे प्रमाण जवळपास गेल्या वर्षी एवढेच असले तरी राज्यातील सर्व मोठी धरणे व प्रकल्पांत २३ मार्च रोजी ११,३८० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे.

पाच वर्षांतील सर्वात कमी सरासरी
मागील पाच वर्षांच्या सरासरीचा विचार करता धरणे व पाणी प्रकल्पांमधील पाणीसाठा खूपच कमी असल्याचे दिसून येते.
गेल्या पाच वर्षांतील आजघडीचा सरासरी पाणीसाठा हा १२,४४२ दशलक्ष घनमीटर एवढा असून राज्याच्या बहुतेक भागात पाण्याअभावी उद्रेक होण्याची भीती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.