जवळपास ३९ टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्येही पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनसुद्धा जवळपास ३९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी आता प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर पडले आहेत. या फेरीमध्ये २३,०४३ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असून ३०,३८६ विद्यार्थी प्रवेशप्रकियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे प्रवेशाविना राहिलेल्या ३७,१४५ विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेशफेरीत महाविद्यालय मिळण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या प्रवेशफेरीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. या फेरीत ८०,१४१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी २३,०४३ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या १८,४६८ विद्यार्थ्यांपैकी ११,१२५ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केला. तर यापैकी ७२८७ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. नवीन नियमानुसार पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक असल्यामुळे प्रवेश घेतला नसला तरी या विद्यार्थ्यांची नावे प्रवेशप्रक्रियेबाहेर पडणार आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये ६२ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश देणे नाकारले आहे. तर १६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर प्रवेश घ्यायचा आहे किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, अशाच विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश रद्द करण्याची मुभा आहे. ही सुविधा पहिल्या फेरीनंतर महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला असून  हवा असलेला विषय नाही, पहिल्या फेरीतील महाविद्यालय नको आहे, अशी कारणे देत महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यासाठी  पालक आणि विद्यार्थ्यांनी चर्नीरोड येथील उपसंचालक कार्यालयात सोमवारी गर्दी केली होती.

अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी

दुसऱ्या फेरीमध्ये आवश्यक ती कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सादर न केल्यामुळे काही महाविद्यालयांनी त्यांचे प्रवेश रद्द केले आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये बदल करण्याची संधी यावेळेस प्रथमच देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी २६ ते २७ जुलै या कालावधीत चर्नीरेड येथील बीजेपीसी कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांसह हजर राहून प्रवेश अर्जामध्ये बदल करून घ्यावेत. बदल केलेल्या विद्यार्थ्यांची नावे तिसऱ्या प्रवेशफेरीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे ते तिसऱ्या फेरीसाठी पात्र असणार आहेत.  इथून पुढे प्रत्येक प्रवेशफेरीनंतर अर्जातील दुरुस्त्या करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून दिली आहे.

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक

* तिसऱ्या प्रवेशफेरीपूर्वी पसंतीक्रम बदलण्याची

मुदत – २६ ते २७ जुलै

* तिसरी जागावाटप यादी २८ जुलैला जाहीर  होणार