मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्य़ांमध्ये चक्रीवादळ झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने यंत्रणा उभारण्यासाठी ३९८ कोटी रुपयांच्या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. जागतिक बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकल्पात राज्य शासनाचा २५ टक्के तर केंद्राचा ७५ टक्के हिस्सा आहे. राज्याच्या हिश्शाचे ८४ कोटी रुपये पाच वर्षांत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर केंद्र सरकारकडून २५५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून ५ किमीच्या आत चक्रीवादळ प्रतिरोधक निवाऱ्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच अखंडित वीज पुरवठय़ासाठी जमिनीखालून विद्युतवाहिनी टाकली जाईल.
रोहित देव यांची नियुक्ती
राज्याच्या सहयोगी महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी ११ जून रोजी राजीनामा दिला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्याकडे महाधिवक्तापदाचा कार्यभार सध्या देण्यात आला आहे.