मध्य रेल्वेवर २०, तर पश्चिम रेल्वेवर २४ पूल

ग्रॅण्ट रोड, वांद्रे, मरिन लाइन्स, चर्नी रोड अशा पश्चिम रेल्वेवरील २४ तर कुर्ला, वडाळा, विक्रोळी आदी मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या २० स्थानकांवर येत्या वर्षभरात पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. वर्षभरात या पुलांचे काम सुरू करण्यात येणार असल्याने या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेवरील अपुऱ्या व अरुंद पुलांचा प्रश्न अधोरेखित झाला. प्रवाशांची वाढती संख्या पाहता पुलांची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील विविध स्थानकांवर ४४ नवीन पादचारी पूल बांधण्यास मंजुरी दिली. यापैकी २० पूल मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर तर २४ पूल पश्चिम रेल्वे मार्गावर बांधण्यात येणार आहेत. वर्षभरात या पुलांचे काम सुरू करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दिवसाला ७५ ते ८० लाखांच्या दरम्यान प्रवासी प्रवास करतात. या प्रवासात प्रवाशांना सर्वाधिक गर्दीचा सामना पादचारी पुलांवरच करावा लागतो. अपुऱ्या आणि अरुंद पुलांवरून प्रवाशांना चालणेही कठीण होते. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर घडलेल्या घटनेनंतर पुलांच्या संदर्भातील हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तात्काळ ४४ पूल रेल्वेमंत्र्यांकडून मंजूर करण्यात आले.

सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई लोकल मार्गावर १०९ पादचारी पूल आहेत, तर मध्य रेल्वे मार्गावर १२५ पेक्षा अधिक पूल आहेत, परंतु हे पूलही कमी पडत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री मुंबईत दोन दिवस तळ ठोकून होते. मुंबईतील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेतानाच पुलांचाही आढावा त्यांनी घेतला होता. त्यावेळी तात्काळ ४४ नवीन पुलांना मंजुरी त्यांच्याकडून देण्यात आली. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेवरील २४ नवीन पुलांपैकी ८ पूल अधिकचे असणार आहेत, तर १४ पूल जुन्या पुलांच्या जागी बांधण्यात येणार आहेत, तर दोन पुलांचा विस्तार केला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील २० पुलांपैकी १४ पूल अधिकचे असतील. तर दोन पुलांचा विस्तार केला जाईल. चार पुलांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

काही पुलांना मंजुरी

महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेवरील विक्रोळी, भांडुप, नाहूर, मुलुंड, टिळकनगर, गोवंडी या स्थानकासाठी प्रत्येकी एक पादचारी पूल यापूर्वीच मंजूर झाले आहेत, तर शीव स्थानकात २ पूल बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील विलेपार्ले येथे एक नवीन पादचारी पूल आणि मरिन लाइन्स येथे एक, वांद्रे येथील दोन आणि भाईंदर येथील एका पादचारी पुलाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पश्चिम रेल्वेवरील स्थानके

’ एक पूल होणारी स्थानके – मरिन लाइन्स, चर्नी रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, माहीम, वांद्रे, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, दहिसर, नायगाव, नालासोपारा, विरार

* दोन पूल होणारी स्थानके – ग्रॅण्ट रोड (पैकी एका पुलाचा विस्तार), मुंबई सेन्ट्रल, बोरिवली, बोईसर

* एकूण – २४

मध्य रेल्वेवरील स्थानके

* एक पूल होणारी स्थानके – दादर, मुलुंड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आटगाव, कसारा, उल्हासनगर, वडाळा, टिळकनगर, गोवंडी, विक्रोळी, चिंचपोकळी, करी रोड (विस्तार होणार)

* दोन पूल होणारी स्थानके – कुर्ला (पैकी एका पुलाचा विस्तार)

सर्वेक्षण सुरू – चार पूल

*  एकूण – २०