विधानसभेवर निवडून आलेल्या २८८ लोकप्रतिनिधींपैकी १२६ म्हणजे सुमारे ४४ टक्के आमदारांनी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर मुंबईतील निम्मे आमदार हे केवळ दहावीपर्यंत शिकलेले आहेत.
गेल्या काही वर्षांत लोकप्रतिनिधींचे शिक्षण हा निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थाही आपल्या विविध पाहण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाचा आवर्जून उल्लेख करतात. राजकारणात शिक्षणाला आलेल्या या महत्त्वामुळे येनकेन प्रकारे आपल्या नावापुढील पदव्या वाढविण्याकडे काही आमदार-खासदारांचा कल असतो.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी ४६ जण दहावी उत्तीर्ण आहेत. तर मुंबईतील ३६ आमदारांपैकी सुमारे ५० टक्के आमदारांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. मुंबईत निवडून आलेल्या एकूण आमदारांमध्ये काँग्रेसचे नसीम खान यांनी केवळ प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा पराभव करून निवडून आलेल्या विद्या ठाकूर या केवळ आठवीपर्यंत शिकल्या आहेत.
शिक्षण कमी असलेले बहुतेक आमदार हे व्यावसायिक आहेत. नववी नापास असलेले अणुशक्ती नगरचे आमदार तुकाराम काते यांचा शेतीचा व्यवसाय आहे. तर दहावी नापास सरदार तारासिंग हे स्वत:ला व्यावसायिक म्हणवून घेतात. अंधेरी(पूर्व) येथून निवडून आलेले रमेश लटके यांचेही शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. हे देखील व्यावसायिक आहेत. दहावीनंतर शाळा सोडणारे चेंबूरचे प्रकाश फातर्फेकर यांनी आपला केबल नेटवर्किंगचा व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे.
राज्याचा विचार करता १५ आमदार आठवीपर्यंत तर आठ आमदार हे पाचवीपर्यंत शिकले आहेत. शिक्षणासाठीच्या रकान्यात बारावीपर्यंत लिहिणारे ५४ जण आहेत. तर तिघा जणांनी आपली शैक्षणिक माहिती साक्षर एवढीच करून दिली आहे. या २८८ नवनिर्वाचित आमदारांपैकी ७० जण पदवीधर आहेत. तर ४९ जण हे पदव्युत्तर व्यावसायिक शिक्षण घेतलेले आहेत. तसेत २८ जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राज्यातील नवनिर्वाचित आमदारांविषयी ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्मस’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने संकलित केलेल्या माहितीत ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

आमदारांची यत्ता कंची?
साक्षर – ३
पाचवीपर्यंत – ८
आठवीपर्यंत – १५
दहावीपर्यंत – ४६
बारावीपर्यंत – ५४
पदवीधर – ७०
पदव्युत्तर व्यावसायिक – ४९
पदव्युत्तर – २८
डॉक्टरेट – ७
इतर – ८