मंत्रालयात खळबळ
अखिल भारतीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर गेल्या चार दिवसांत मंत्रालयातील विविध विभागांतील ४५२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महसूल, गृह, नगरविकास अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांचीही उचलबांगाडी करण्यात आली आहे.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नव्या विभागात १ जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यात टाळाटाळ किंवा राजकीय दबाव वा अन्य प्रभाव वापरून बदली रद्द करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. २३ मे रोजी बदली करण्यात आलेल्या उपसचिव माधव काळे व डॉ. संतोष भोगले यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदली झालेल्या विभागात हजर राहण्याचा स्वतंत्र आदेश शुक्रवारी २७ मे रोजी काढण्यात आला. काळे यांची महसूल विभागातून सामान्य प्रशासन विभागात व भोगले यांची सामान्य प्रशासन विभागातून महसूल विभागात बदली करण्यात आली आहे.
या महिन्याच्या प्रारंभीच मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील व अन्य विभागांतील सुमारे ८० हून अधिक आयएएस अघिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. वित्त विभागातील चारही सचिवांच्या एकाच वेळी बदल्या करून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आता मंत्रालयात विशिष्ट विभागांमध्ये वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राजकीय लागेबांधे वापरून गेली २५ वर्षे एका विभागात जागा अडवून बसलेल्या उपसचिवाची उचलबांगडी करण्यात आली आहे. २३ ते २७ मे या चार दिवसांत मंत्रालयातील विविध विभागांमधील ४५२ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात ४ सहसचिव, ८ उपसचिव, ८ अवर सचिव, ७७ कक्ष अधिकारी, १८८ साहाय्यक कक्ष अधिकारी, २५ उच्चश्रेणी लघुलेखक व १४२ लिपिक-टंकलेखकांचा समावेश आहे. ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना १ जूनपासून नव्या विभागात रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे. बदलीच्या जागी रुजू न होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आधीच्या विभागातून वेतन काढण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.